दिलखुलास गायिका आशाताईं @८५

गायिका आशा भोसले म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. यांचा ८५ वा वाढदिवस.

दिलखुलास गायिका आशाताईं @८५
Pic courtesy: @ashabhosle

८ सप्टेंबर आशाताईंचा वाढदिवस.गायिका आशा भोसले म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू झालेला सप्तसुरांचा हा प्रवास आजही एखाद्या खळखळत्या झऱ्याप्रमाणे सुरु आहे. काय आहे ही जादू ?  

सुरेल सुरांचं वरदान लाभलेल्या मंगेशकर कुटुंबियात ८ सप्टेंबर १९३३ रोजी आशाताईंचा जन्म. लता, मीना, आशा, उषा आणि ह्रदयनाथ. सप्तसुरांचा भरभरून आशीर्वाद लाभलेली ही पाच भावंडे. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले आणि लता दीदींवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींनी वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. यात कुटुंबाला आर्थिक हातभार देण्याचीच भूमिका अधिक होती. लता दीदींपाठोपाठ आशाताईंनीही आपल्या सुरांच्या साथीने प्रवास सुरू केला. वय होतं केवळ दहा वर्षे..आजही वयाच्या ८५ व्या वर्षीही हा प्रवास अविरतपणे सुरु आहे. अर्थात त्याला जोड आहे प्रचंड जिद्दीची आणि तितक्याच खळाळत्या झऱ्यासारख्या उत्साहाची.

भावगीत असो, गझल असो, सुगम संगीत असो की पॉप...गाण्याचा प्रत्येक मूड अचूक टिपत ते थेट प्रेक्षकांच्या ह्रदयात पोचवणं जमलं ते केवळ आशाताईंना...
आवाज जेवढा नितळ तेवढाच रोमॅण्टिकही..मराठी, हिंदी, तेलगु, गुजराती अशा 20 हून अधिक भाषांमध्ये आशाताईंनी आपल्या सुरांची बरसात केलीये.  याच सुरांच्या जादूने अनेक सिनेमे गाजवले. आजही या आवाजाची जादू रसिकांवर कायम आहे. म्हणूनच आशाताई हे नाव आजच्या गायक-गायिकांनाही जणू एक चालतंबोलतं विद्यापीठच वाटतं. 

गायन क्षेत्रातील तब्बल सात दशकांचा हा प्रवास आहे. पिढ्या बदलल्या मात्र आशाताईंनी आपल्या जादूई आवाजाची केलेली पेरणी आजही तशीच बहरते आहे. नव्या पिढीसाठी आशाताई हे नाव म्हणजे जणू दैवत बनलं आहे. खरंतर प्रत्यक्ष जीवनात आशाताईंना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. मात्र डगमगून न जाता आशाताई या सगळ्याला मोठ्या धाडसाने सामोऱ्या गेल्या. एवढा हा कणखरपणा नेमका येतो कुठून याच नेहमीच त्यांच्या चाहत्यांना अप्रूप वाटतं. लतादीदी आणि आशाताई यांच्यात एक इर्षा आहे, स्पर्धा आहे, असं अनेकदा बोललं जाते.  

Impossible for anyone to take Kishore Kumar's place: Asha Bhosle
 
सप्तस्वरांच्या धाग्यात ही भावंडं एकरुप झालीयेत. जीवनात दुःख खूप झेलली. मात्र रसिकांच्या प्रेमाने बळ वाढत गेल्याची भावना आशाताई नेहमी व्यक्त करतात. खूप दु:ख झेलली, रसिक आणि देवाचा आशीर्वाद लाखो मनांवर आपल्या सुरैल आणि तितक्याच बहारदार सुरांची  बरसात करणाऱ्या या सदाबहार, दिलखुलास गायिकेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close