दोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके

अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच झालेला ‘फेंडशिप डे’ आणि अभिनय सम्राट दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त या दोन दिग्गजांच्या मैत्रिबद्धल…

Updated: Aug 8, 2017, 08:03 PM IST
दोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके title=

अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई  :  दोन प्रतिभावान व्यक्ती, अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. दोघेही आपापल्या क्षेत्रात बाप. एक कुंचल्याने फटकारे मारणारा तर, दुसरा अभिनयाचे चौकार ठोकणारा. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. नुकताच झालेला ‘फ्रेंडशिप डे’ आणि अभिनय सम्राट दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त या दोन दिग्गजांच्या मैत्रिबद्दल…

लेखक, नाटककार वसंत सबनिस लिखीत ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत होते. त्याला कारण होते दादा कोंडके या नटाचा त्या वगनाट्यातील अभिनय. वगनाट्यात काम करता करता दादांनी भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. दरम्यान, दादांनी स्वत: चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सोंगाड्या या चित्रपटाची निर्मिती केली.

साधारण १९७३-७४चा तो काळ. त्या काळात मराठी माणूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिकाराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी माणसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट. दादांना चित्रपट प्रदर्शित करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. त्यावेळी ‘तिन देवियां’ हा चित्रपट ‘कोहिनूर’ला लागला होता.

दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी माणसाचा चित्रपट प्रदर्शित करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली. बाळासाहेबांनी आदेश दिला आणि दादांचा चित्रपट झळकला. तेव्हापासून दादांनी अखेरपर्यंत मागे वळून कधीच पाहिले नाही. दिवसेदिवस दादांच्या यशाची कमान चढतीच राहिली. मराठी रसिकांनी दादांवर भरभरून प्रेम केले.

बाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसापासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.

आपल्या चित्रपटांतून भाषणांतून दादांनी अनेक नेत्यांची खिल्ली उडवली. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्यापर्यंत. पण दादांनी बाळासाहेबांवर कधीच कोणत्याही प्रकारे एकही शब्द वाकडा उच्चारला नाही. एकदा तर, एका राजकीय नेत्याने दादांना राजकीय पक्षांवर टीका करा असे सांगितले. तेव्हा दादा म्हणाले मी कोणावरही टीका करीन फक्त शिवसेना आणि बाळासाहेब यांच्यावर बोलणार नाही, असे स्पष्ट सांगूनच टाकले.

दरम्यान, राज्यात युतीचे सरकार सत्तेत आले. अनेकांनी मंत्रीपदे मिळविण्यासाठी मातोश्रीवर गर्दी केली. बाळासाहेबांनीही आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींना त्याबाबत विचारले. अर्थातच बाळासाहेबांनी दादांनाही विचारले. तुम्हाला कोणते मंत्रीपद हवे ? दादांना सांस्कृतीक मंत्रीपद द्यायचा बाळासाहेबांचा विचार होता. क्षणाचाही विलंब न लावता हजरजबाबी दादांनी शिवसेनाप्रमुखांना प्रतिप्रश्न केला. तुम्ही कोणते पद घेणार तेव्हा, मी शिवसेनाप्रमुखच राहणार असे, बाळासाहेब म्हणाले. त्यावर मीही शिवसैनिकच राहणार असे दादांनी सांगितले.

दादा अनेकदा शिवसेना उमेदवारांच्या प्रचारालाही जात. दादा तेथे आपल्या भाषणात डबल मिनींग बोलायचे. अगदी डबल मिनींग बोलून राजकीय नेत्यांचीही खिल्ली उडवायचे. अशा भाषणांनी दादांचे शत्रूही अनेक झाले होते. त्यामुळे दादांवर कोणीतरी हल्ला करेन असा विचार त्यांचे काही मित्र व्यक्त करायचे. तेव्हा दादांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांचा एक ताफाच दादांच्या दिमतीला असायचा. जवळपास पाच-पन्नास शिवसैनिक दादांच्या पाठीमागून याचचे जोपर्यंत दादा सुरक्षितपणे घरी पोहोचल्याची खात्री होत नाही. तोपर्यंत हे शिवसैनिक दादांचा पिच्छा करायचे.

दरम्यान, शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे आणि अभिनयसम्राट दादा कोंडके आज दोघेही आपल्यात नाहीत. मात्र, मैत्रीचा विषय निघाला की, या दोन व्यक्तिमत्वांची आठवण नक्कीच होते.