पिंपरी चिंचवड : मंत्रिमंडळ विस्तार आणि आझम पानसरे....!

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा निघाली की, पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा होते, ती भाजप आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची.

Updated: Jun 27, 2018, 02:57 PM IST
पिंपरी चिंचवड : मंत्रिमंडळ विस्तार आणि आझम पानसरे....! title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी - चिंचवड : मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा निघाली की, पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा होते, ती भाजप आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची. दोघांपैकी एकाची निवड मंत्रिमंडळात होईलही....पण याच निमित्ताने शहरातील एका नेत्याची चर्चा होणे खरेच गरजेचे आहे..! तो नेता म्हणजे आझम पानसरे...! त्याला कारणे ही अनेक आहेत....! खरे तर शहरात ज्याला राजकारण कळते तो आझम पानसरे यांच्या व्यक्तिमत्वाचे महत्व चांगलेच ओळखून आहे....! म्हणूनच आझम पानसरे हा नेता "THE KING WITHOUT KINGDOM" ही भावना शहरातल्या अनेकांची आहे. आयुष्यभर शरद पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या या नेत्याच्या भाजप प्रवेशानंतर त्याला मिळणार काय हा प्रश्न म्हणूनच महत्वाचा आहे...!

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली की या वेळी तरी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप किंवा आमदार महेश लांडगे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी आशा त्यांचे कार्यकर्ते बाळगून असतात... त्याला कारण अर्थातच या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला जमिनदोस्त करत महापालिकेत भाजप ची सत्ता प्रस्थापित केली. महापालिका सत्ता परिवर्तनामध्ये या दोन्ही नेत्यांचा महत्वपूर्ण वाटा होता यात शंकाच नाही. पण महापालिका निवडणुकांपूर्वीच शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या आझम पानसरे यांनी ही शेवटच्या क्षणी भाजप प्रवेश करत अजित पवारांना धक्का दिला होता. 

अर्थात भाजप प्रवेश करताना आझम पानसरे यांना भाजप कडून नक्कीच मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले गेले होते. आझम पानसरे यांनी ही भाजप च्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली हे ही तितकेच खरे...! राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान १५ ते २० जागा या आझम पानसरे यांच्या मुळे पडल्या असे त्यांचे समर्थक छातीठोक पणे सांगतात...पण पालिकेच्या विजयाचे श्रेय जेवढे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना दिले जाते तेवढे पानसरे यांना दिले गेले नाही हे ही तितकेच खरे...! मुळात आझम पानसरे हे शहरातले मोठे नेते असले तरी त्यांच्यावर अन्याय होणे हे नवे नाही...अगदी सुरुवाती पासून...!  

आझम पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना, विलास लांडे, लक्ष्मण जगताप आणि स्वतः पानसरे असे गट होते. ताकतीचा विचार केला तर तीनही नेते कमी अधिक प्रमाणात समसमान पातळीवर होते. पण राजकीय लाभाचा विचार केला तर आझम पानसरे यांना त्यांच्या क्षमतेचा विचार करता या दोन नेत्यांच्या तुलनेत खूप कमीच लाभ मिळाला. आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही. शरद पवार यांच्या बरोबर आझम पानसरे यांचे संबंध चांगले असले तरी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ही पानसरे यांचे फारसे जमले नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना आझम पानसरे यांना विधानसभा आणि लोकसभा यांचे तिकीट पक्षाने दिले. पण त्याच वेळी पद्धतशीर पणे पक्षातल्याच विरोधकांना त्यांच्या विरोधात काम करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर या निवडणुकांना पद्धतशीरपणे जातीचा रंग दिला गेला आणि पक्षाची आणि स्वतः ची ताकत असताना ही आझम पानसरे यांना पराभव पत्करावा लागला...! त्याचे शल्य आझम पानसरे यांना कायम राहिले. पानसरे यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना राज्यमंत्री दर्जाचे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष पद दिले. पण हे पद फक्त नावालाच असल्याचे त्यांच्या लवकरच लक्षात आले. त्यानंतर पानसरे राजकारणात पूर्वी प्रमाणे सक्रिय राहिले नाहीत. या काळात त्यांचे लक्ष्मण जगताप यांच्याशी राजकीय वैरच राहिले.     

एकीकडे पक्षावर नाराजी असताना देश आणि राज्यातले राजकीय वातावरण प्रचंड बदलले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पुरती धूळधाण झाली. पण तरी ही पानसरे राष्ट्रवादी मध्ये होते. त्या नंतर महापालिका निवडणुकांमध्ये मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी लक्ष्मण जगताप यांना पानसरे यांना पक्षात आणण्यात यश आले.

पानसरे यांना ही अजित पवार यांच्यावरचा वचपा काढण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली आणि राजकीय वैर विसरत पानसरे यांनी महापालिका निवडणुकीत भाजप प्रवेश करत लक्ष्मण जगताप यांच्या मांडीला मांडी लाऊन राष्ट्रवादीला सत्तेतून हद्दपार केले. अर्थात पक्षात जाताना भाजप ने त्यांना मोठे आश्वासन दिल्याची चर्चा होती. आता पुन्हा मंत्रिमंळ विस्ताराची चर्चा सुरु झालीय. 

अर्थात शहाराच्या दृष्टीने त्यात लक्ष्मण जगताप किंवा महेश लांडगे यांच्या समावेशाची आशा सर्व जण बाळगून आहेत. पण त्याच वेळी आझम पानसरे यांचे नाव मात्र चर्चेत येत नाही. शहरात ताकत असून ही, अनेकांना पाठबळ देणारा अशी ओळख असून ही आणि महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजाप मध्ये ही अन्याय होतोय का अशी शंका म्हणूनच उपस्तिथ होतेय.

आता या क्षणी जर पानसरे यांना किमान आमदार तरी करावे अशी आशा त्यांच्या पाठीराख्याना आहे. पण तसे घडले नाही तर आझम पानसरे यांच्या मनात या उपेक्षेची जखम कायम भळभळत राहणार हे ही तितकेच खरे....!

( ता. क. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्ववभूमीवर सहज चर्चा सुरु असताना आझम पानसरे यांच्या विरोधातील एका नगरसेवकाने पानसरे यांचे केलेले वर्णन - "खूप मोठा नेता आहे पण नशिबाने साथ दिली नाही".  नगरसेवकाच्या त्या वाक्याच्या आधारावर आझम पानसरे यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा..पानसरे यांच्या प्रतिभा संवर्धनाचा कसला ही प्रयत्न नाही. कार्यकर्ते आणि काही राजकीय अभ्यासकांच्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न...! )