इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे

आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 26, 2018, 03:18 PM IST
इंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.

मराठी भाषेत इंटरनेटवर दर्जेदार लिखाण

मराठी भाषेत इंटरनेटवर दर्जेदार लिखाण करण्याची आणि आणखी प्रेक्षक संख्या मिळवण्याची गरज आहे. जेवढं दर्जेदार लिखाण इंटरनेटवर, ब्लॉग, वेबसाईट आणि सोशल साईटच्या माध्यमातून होईल, तेवढा भाषेचा आर्थिक स्तर इंटरनेटवर उंचावणार आहे.

भाषेचा आर्थिक स्तर इंटरनेटवर उंचावेल म्हणजे नेमकं काय?

यावर तुम्हाला नक्की एक प्रश्न पडेल की, मराठी भाषेचा आर्थिक स्तर इंटरनेटवर उंचावेल म्हणजे नेमकं काय होईल. तर याचं असं उत्तर आहे, जेवढं दर्जेदार लिखाण मराठी भाषेत होईल, वेगवेगळ्या विषयाची माहिती इंटरनेटवर येईल, आणि जेवढं मोठ्या प्रमाणात वाचन होईल, यानंतर गुगलकडून गुगल अॅडसेन्स आणि गूगल अॅडवर्ल्डसाठी मराठी भाषा अधिकृत मानली जाईल. 

गूगल अॅडसेन्स आणि अॅडवर्ल्ड

गुगल अॅडसेन्सने ब्लॉगर, वेबसाईट, व्हिडीओंवर जाहिरात प्रसारीत होतात, याचा पैसा ब्लॉगर, वेबसाईट मालक, व्हिडीओंचे दावेदार यांना मिळतो, हा आर्थिक आधार, भाषेतील लिखाण वाढण्यास मदत करणारा आहे, व्यावसायिक दृष्टीने देखील भाषा समृद्ध होणार आहे.

समृद्ध, दर्जेदार, लोकप्रिय, वाचनीय

तर गूगल अॅडवर्ल्डच्या माध्यमातून जाहिरातदार ब्लॉगरचं लिखाण, वेबसाईट, व्हिडीओसाठी जाहिराती देतात, मात्र गुगलच्या अधिकृत भाषांच्या यादीत आपली भाषा असायला हवी आणि या यादीत येण्यासाठी तेवढं, समृद्ध, दर्जेदार, लोकप्रिय, वाचनीय लिखाण इंटरनेटवर येणं महत्वाचं आहे.

काही प्रादेशिक भाषा गुगल अॅडसेन्ससाठी आश्वासक

इतर भारतीय काही प्रादेशिक भाषा गुगल अॅडसेन्ससाठी आश्वासक भाषा आहेत. हिंदी भाषेला देखील गुगल अॅडसेन्सकडून पाच वर्षापूर्वी जाहिराती देणे आणि घेणे यासाठी अधिकृत भाषा म्हणून विचारात घेण्यात आलं, वर्षभरापूर्वी बंगाली भाषेचा देखील यात समावेश करण्यात आला, आता तमिळ भाषेचा यावेळी समावेश करण्यात आला.

आर्थिक मोबदला मिळाल्याने लिखाणाला चालना

आर्थिक मोबदला मिळण्याचं प्रमाण वरील भाषांना निश्चितच वाढणार आहे, यामुळे नवोदीत लेखकांना आर्थिक मोबदला मिळणार आहे, यामुळे त्या त्या भाषेतील वेबसाईट वाढण्यास मदत होणार आहे. 

उचलेगिरी टाळा, नाहीतर भाषेची पत खालावते

आपणंही देखील मराठी भाषेच्या माध्यमातून लेखकांना आर्थिक समृद्धीकडे नेऊ शकतो, मात्र यासाठी गरज आहे, चांगल्या दर्जेदार लिखाणाची आणि एक बाब यात प्रकर्षाने मांडता येईल, ती म्हणजे तुम्ही तुमच्याच भाषेतील इतर लेखकांच्या लेखांची उचलेगिरी करून तुमच्या वेबसाईटवर, ब्लॉगमध्ये, किंवा वेबसाईटवर प्रकाशित केली, तर अशामुळे भाषेची पत निश्चितच गुगलकडे खालावते, आणि भाषा अधिकृत भाषेत येण्याच्या यादीपासून आणखी दूर जाते.

सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र आज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close