मासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....

'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2018, 09:08 PM IST
मासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई :  'द्विलिंगी असलेल्या डॅनियलची कहाणी' 'झी २४ तास'ला ऑन एअर गेली  डॅनियलला शुभेच्छा देणारे, त्याची चौकशी करणारे अनेक मेसेज कॉल्स येऊ लागले. 'त्याला खरच ब्लीडींग होतं का ? मला त्याच्याशी पिरिअड्सबद्दल बोलायचय.' अस काही मैत्रिणींनी विचारणा केली. 'त्याला स्वत:च्या पोटी बाळाला का जन्म द्यायचाय ?',  'त्याचा स्वभाव कसा आहे ?', 'तु त्याला कसा ओळखतोस असे विचारणार ?' असेही काही प्रश्न.  'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं

'एलजीबीटी' कम्यूनिटी बद्दल दीड वर्षांपूर्वी 'लोकमत ऑक्सिजन'ला स्टोरी केली होती. त्यावेळी या कम्युनिटीच्या प्रतिनिधींच्या भेटी घेत होतो. लेस्बिन, गे, बायोसेक्शुयल. ट्रान्सजेंडर यातील अनेकांनी त्यांची कहाणी सांगितली. स्टोरी महाराष्ट्रात पोहोचली होती. डॅनियलसोबत पहिली भेटही यादरम्यानच झाली. पर्सनला अनेक ईमेल्स आले होते.

बाळ कोण होणारं ?

त्यात एक ईमेल सुन्न करणारा होता. 'माझ्या बाळाच्या लिंगाविषयी आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत. आम्हाला यातून मार्ग दाखवा. बाहेर काढा.' आपलं बाळ 'एलजीबीटी'पैकी आहे असा त्यांना संशय आणि भिती होती.

काही जेंडर समुपदेशकांना त्यांच्याशी जोडून देण्याइतकीच मदत होऊ शकली. पण या विषयाबद्दल आजही दबल्या आवाजात, घाबरत प्रश्न विचारले जातात हे दिसून आलं. अनेकांच्या मनात याबद्दल शंका आहेत. अनेकांना यांच्याबद्दल जाणूनही घ्यायचय. पण हे आपल्यासारखे नाहीत असे म्हणत विषय संपवला जातो.

आत्महत्येचा प्रयत्न

या स्टोरीवेळीच डॅनियल भेटला. हा जन्मताच द्विलिंगी असून याला मासिक पाळी येते असं याच्याबद्दल ऐकल होतं. याआधी मी 'एलजीबीटी' बद्दल ऐकल होतं. पण डॅनियल 'इंटरसेक्स' आहे. तो द्विलिंगी असून त्याला पिरिअड्स येतात. हे याआधी कधी ऐकण्या-वाचनात आलं नव्हतं.

डॅनियल ४ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला तृतीयपंथ्यांकडे विकलं. आई त्याला पुन्हा घरी घेऊन आली. पाठीशी खंबीर उभी राहीली. शेजारी, मित्र मिळून त्याला बायल्या, छक्का असं हिणवायचें. त्रासाला कंटाळून त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. सुदैवाने फसला. डॅनियलला नवं आयुष्य मिळालं. 'आता मी कोणाला घाबरुन पळून जात नाही. तर तिथेच उभा राहून जगाला स्वत: बद्दल सांगतो. ' डॅनियलचा आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसत होता. 

त्याला बरच काही सांगायच होतं. काही वेळात त्याने मनमोकळ केलं. खूप जुन्या मित्राशी गप्पा मारतोय असा बोलू लागला.

बीएसडब्ल्यू डॅनियल

त्यानंतर अनेकदा वेगवगळ्या विषयांवर फोनवर बोलणं व्हायच. गेल्या महिन्यात डॅनियलने रुईया महाविद्यालयात 'जेंडर अवेयरनेस'वर लेक्चर देण्यासाठी आला होता.

दोन दिवसांपूर्वी डॅनियलचा फोन आला. मी बीएसडब्ल्यू झालोय. मुंबई विद्यापीठातून दुसरा आलोय. त्याच्या सांगण्यात आनंद होता. डॅनियलच लहानपणापासूनत स्ट्रगल मी ऐकल होतं.

ही संधी होती त्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वांसमोर न्यायची. पण ऑफिसमध्ये ही गोष्ट कशी पटवून द्यायची हा पुन्हा प्रश्न. कारण विशेषत: मराठी माध्यमांमधे 'एलजीबीटी' कम्यूनिटी बद्दल फार कमी कहाण्या समोर येतात.

मराठी वाचक नाही ?

मागे एका वरिष्ठांना या कम्युनिटीबद्दल सांगितल तर म्हणे, 'तु आहेस का त्या कम्युनिटीचा ? तुला का त्यांच अप्रुप ? आपला वाचक हे वाचणारा नाहीए. अशा बातम्या नको.' अस ऐकायला मिळाल. हा खूप मोठा धक्का होता.

खूप वर्षे पत्रकारीता केलेल्या माणसाला यांचा संघर्ष सांगून कळत नसेल तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करायची ? 

प्रशांत जाधव सरांना डॅनियलची स्टोरी ऐकवली. त्यांना डॅनियलबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाढली. स्टोरी होणार हे तेव्हाच निश्चत झालं होतं. डॅनियल शिकत असलेल्या निर्मला निकेतन कॉलेजमध्येच स्टोरी करायच ठरलं.

इनसे पंगा नही लेनेका...

युनिट घेवून सकाळी कॅमेरामॅनसोबत निघालो. गाडीमध्ये त्याला स्टोरी सांगत असताना ड्रायव्हरने मध्येच अडवले. त्याला तृतीयपंथ्यांसोबत आलेला अनुभव शेयर करायचा होता.

'ये लोगो का शाप बहोत बुरा होता है. इनसे पंगा नही लेना चाहीए. एकबार ट्रेनमे किसीने पैसा दिया नही तो एकने साडी उपर किया. फिर मैने उसे दस रुपया देकर सलाम किया. इनकी दुवा अच्छी होती है, लेनी चाहीए,' असेही त्याने सांगितले.

ते त्यांच्या मतावर ठाम होते. डॅनियलची कहाणी बघितल्यावर तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील एवढ सांगून विषय तिथेच संपवला.

दाढीपण आणि साडीपण...

कॉलेजमध्ये डॅनियल साडी नेसून आला होता.

कॉलेजचा एक स्टाफ त्याच्या कानाजवळ सांगत होता. 'तु साडी नेसलायस पण पूर्ण दाढी करुन आला नाहीएस. तुला कॅमेरा समोर जायच माहित होतं.' मी जवळून हे सर्व ऐकत होतो. डॅनियलने दुसऱ्या क्षणाला त्याला उत्तर दिल.

साडी आणि दाढी ही माझी ओळख आहे. ही ओळख मला जगासमोर न्यायची आहे. म्हणून मी शेव करुन आलो नाही. स्वत: च्या असण्यादिसण्याबद्दल, स्वत:च्या विचारांबद्दल तो अत्यंत स्पष्ट आहे. तो जसा आहे त्याने स्वत: ला तसं मान्य केलयं. 

सध्या तो 'युवा' या सामाजिक संस्थेत कामाला आहे. ख्रिश्चन धर्मगुरू, पोलीस, महाविद्यालयांसोबत राहून जेंडर अवेअरनेस करतोय.

आयुष्याला भिडतोय 

बातमीदार म्हणून बातमीच्यामागे फिरताना वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसं भेटत राहतात. त्यातली काहींशी कामापुरता संबध येतो.

पण काही माणसं आपल्या मनात कायम घर करुन बसतात. डॅनियलही त्यातलाच एक. डॅनियल थांबणाऱ्यातला नाही. अंगाला माती लावून शड्डू ठोकून उभा राहिलेल्या पेहेलवानासारखा तो आयुष्याला भिडतोय.  

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close