‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती

स्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं जीवन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज आला होता. पण तेव्हा हा मनात इतका भिनेल असा जराही विचार केला नव्हता. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 10, 2017, 06:30 PM IST
‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती title=

आई-बाबा आपल्या अपत्यासाठी वाट्टेल ते सोसतात, ते मुलांसाठी किती त्याग करतात, स्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे.

तसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं जीवन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज आला होता. पण तेव्हा हा मनात इतकाह भिनेल असा जराही विचार केला नव्हता. 

जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असून यातून स्पेशल मुलाचं आणि त्यांच्या पालकांचं अपुरं जगणं दाखवण्यात आलं आहे. अभिनेता प्रसाद ओक याचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळेही या सिनेमाची उत्सुकता वाढली होती. कारण इतका वेगळा विषय त्याने पहिल्याच सिनेमासाठी निवडला. खरंतर हा इतका संवेदनशील विषय निवडण्यासाठी प्रसाद ओक यांचं अभिनंदन करायला हवं आणि धाडसासाठी दाद द्यायला हवी. पहिलाच सिनेमा असला तरी गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि सिनेमा असा मोठा अनुभव प्रसाद यांच्याकडे असल्याने त्या अनुभवाचा फायदा इथे दिग्दर्शन करताना त्यांना झाल्याचं दिसतं. 

* कथानक : 

ही कथा आहे मोहन काटदरे(रवी जाधव) आणि शैला काटदरे(सोनाली कुलकर्णी) यांची आणि त्यांच्या स्पेशल मुलगा बच्चू (मनमीत पेम) यांची. काटदरे कुटुंब हे मुंबईत राहणारं सर्वसामान्य कुटुंब आहे. बच्चू हा स्पेशल असल्याने मोहन काटदरे आणि शैला काटदरे याचं जगणं तसं कठिण झालं आहे. त्यांचं त्यांच्या वाट्याचं जगणं हरवलं आहे. बच्चू आता वयाने वाढला असून त्याच्या शारिरीक वाढही होत आहे. अशात त्याच्या लैंगिक जाणिवा जागृत व्हायला लागल्या आहेत. बच्चूमुळे त्याच्या आई-वडीलांचं पर्सनल आयुष्य पारच उध्वस्त झालं आहे. त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला, स्वत:चा आनंद शोधायलाही वेळ नाहीये. त्यामुळे त्यांची झालेली स्थिती, त्यांचं मन मारून जगणं या कथेत रेखाटण्यात आलंय. अशातही ते आनंद कसा शोधतात हे या कथेतून रेखाटण्यात आलं आहे. 

कसा वाटला सिनेमा :

खरंतर स्पेशल मुलं हा विषय तसा नवीन नाहीये. पण त्या स्पेशल मुलांमुळे त्यांच्या आई-वडीलांना कसं जगणं भाग पडतं, त्यांना काय सहन करावं लागतं हे या सिनेमातून सोप्या पद्धतीने पण तितक्याच टोकदारपणे समोर येतं. काही सीन खूपच अंगावर येतात. त्यातल्या त्यात उदाहरण द्यायचं तर बच्चूने आईच्या अंगावर हात टाकणे. असे अनेक सीन आहेत. या सिनेमामुळे त्या लोकांचं जगणं अनुभवायला मिळतं. कदाचित या सिनेमामुळे त्या लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. पहिल्या भागात सुरू झालेली कथा ही शेवटपर्यंत तोच मूड कायम ठेवते. पडद्यावरील कथेत आपण कधी एकरूप होतो हे कळतंच नाही. सिनेमा संपल्यावरही कथेचा विचार बराच वेळ मनात सुरू असतो. याहून अधिक काय हवंय. हा सिनेमा आपल्याला स्तब्ध करतो, विचार करायला भाग पाडतो, सून्न करतो. 

दिग्दर्शन - लेखन :

दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या सिनेमाची मांडणी खूपच कट टू कट आणि नेमकी केली आहे. जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कांदबरीचा सिनेमा करताना उगाच कुठेही हा विषय भरकटू दिला नाही. व्यवस्थित, सोपी आणि सहज मांडणी त्यांनी केली आहे. त्याला चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या तितक्याच चांगल्या पटकथेची आणि संवादाची साथ मिळाली आहे. सिनेमातील प्रत्येकाचं दुखणं खूपच बारीक संदर्भासहीत दिलं आहे. हा सिनेमा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटमध्ये आहे. हा असा का आहे ? असा प्रश्न अनेकांना पडेल. पण ते उगाच नसून त्यालाही एक अर्थ आहे. बच्चूच्या स्पेशल असण्याने मोहन आणि शैला यांच्या जीवनातील रंग कसे बेरंग झाले आहेत हे त्यातून दाखवण्यासाठी तसं करण्यात आलंय.  

अभिनय : 

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी पहिल्यांदाच इतकी मोठी भूमिका साकारली आहे. अभिनेता म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आणि त्यात इतकी खोली असलेली भूमिका त्यांनी मस्त साकारली आहे. या भूमिकेसाठी लागणारा एक वेगळेपणा त्यांच्यातून प्रसादने उत्तम काढलाय. ही भूमिका त्यांच्यावर बरोबर शोभली आहे. तर शैलाची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी कमाल साकारली आहे. शैलाचं दु:ख त्यांनी इतक्या उत्कटतेने अनेकदा संवाद नसतानाही उत्तम मांडले आहे. सोनाली यांच्या इतर भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. एक स्त्री म्हणून अशा मुलाच्या आईला काय सहन करावं लागतं, हे त्यांनी फार फार उत्तम अभिनयातून साकारलं आहे. तर मनमीत पेम यानेही त्याची जबाबदारी उत्तम साकारली आहे. इथे खास उल्लेख करावा लागेल तो सचिन खेडेकर यांचा. त्यांनी त्या तुलनेट छोटी पण तितकीच महत्वाची भूमिका नेहमीप्रमाणे चोख साकारली आहे. इतरही कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिलाय.

सिनेमटोग्राफी : 

अमलेंदुर चौधरी यांनी या सिनेमाची फारच उत्तम सिनेमटोग्राफी केली आहे. पडद्यावरील पात्रांच्या भावना टिपण्यासाठी त्यांनी घेतलेले क्लोजअप शॉट्स उत्तमच जमले आहेत. तसेच संपूर्ण सिनेमाच त्यांच्या कॅमेराने सुंदर आणि तितकाच रिअल दिसला आहे. अनेक सीन्समध्ये केवळ एक्सप्रेशन आहेत, अशात एकही डायलॉग नसताना त्यांच्या हावभावातून त्यांना जे सांगायचंय ते फारच उत्तम टिपलं आहे. 

संगीत : 

या सिनेमात एकच गाणं आहे. तेही सिनेमा संपतो तेव्हा क्रेडिट्ससोबत ते गाणं वाजतं. राहुल रानडे यांनी या गाण्याला संगीत दिलंय. हे गाणं खूप उत्तम झालंय.अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गाणं सिनेमा संपल्यावरही फार इमोशनल करून जातं. संदीप खरे यांनी हे गाणं लिहिलं असून अवधूत गुप्ते यांनी फारच कमाल गायलं आहे. 

एकंदर काय तर हा प्रसाद ओक यांनी दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात सिक्सर लगावला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खरंतर या सिनेमाची कथाच इतकी चांगली आहे की, ती प्रत्येकाने बघावी. स्पेशल मुलं असणा-यांचं जगणं अनुभवण्यासाठी निदान एकदा हा सिनेमा बघता येऊ शकतो. प्रत्येकवेळी धांगडधिंगा असलेले, मसाला असलेले सिनेमेच बघायला पाहिजे असे काही नाही. कधी कधी अशा सिनेमातून जे अनुभवायला मिळतं तेही अनुभवलं पाहिजे. 

रेटींग : ४ स्टार