बोलणा-या सोनचाफ्याची जत्रा..

  तुमची जन्मभूमी आणि तिचा वैभवसंपन्न वारसा हा जर तुमचा अभिमान असेल तर तुमच्याएवढं जगात श्रीमंत कुणीच नसेल.. मला आठवतय मी टीव्ही चॅनलला जॉईन झाल्यापासून दरवर्षी तीन लेख मालवणबद्दल लिहीतो. 

Updated: Oct 20, 2017, 06:59 PM IST
 बोलणा-या सोनचाफ्याची जत्रा.. title=

ऋषी देसाई, झी मीडिया, मुंबई :  तुमची जन्मभूमी आणि तिचा वैभवसंपन्न वारसा हा जर तुमचा अभिमान असेल तर तुमच्याएवढं जगात श्रीमंत कुणीच नसेल.. मला आठवतय मी टीव्ही चॅनलला जॉईन झाल्यापासून दरवर्षी तीन लेख मालवणबद्दल लिहीतो. 

मालवणची पालखी जत्रा 

आंगणेवाडी जत्रा, मालवणचा गणेशोत्सव आणि तिसरा म्हणजे मालवणची पालखी जत्रा. दरवर्षी नव्या उत्साहाने लिहाव आणि पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राला आठवणीच्या आणि उत्साहाच्या सोहळ्यात सामावून घ्यायचा ही तर आता लेखप्रथा झालीय. माझेच केवळ मालवणच्या जत्रेवर पुस्तक निघेल एवढे स्वतःचे लेख झालेत. दरवर्षी नव्या उत्साहाने आणि नव्या नजरेने माझ्या मालवणची जत्रा मला दिसते आणि तेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान असते. ही शब्दाची पालखी अवघ्या मराठीजनांसमोर मिरवायची आणि आपण त्याचे भोई व्हायचे हा रिवाज खूप श्रीमंत करणारा असतो. 

देवाची सेवा लेखनधर्म....

गावरहाटीत प्रत्येक मानक-यांकडे एक काम नेमून दिलेले असते. तसंच आपणही देवाची सेवा म्हणून आपला लेखनधर्म पाळत हे संस्कृतीचे अबदागीर दिंगतात मिरवायाचे हाच आता नित्यक्रम झालाय. दिवाळी पाडवा आणि श्री देव नारायण श्री देव रामेश्वर जत्रा यांचे आणि प्रत्येक मालवणकरांचे एक नाते आहे. हे नाते जेवढे पालखी समीप ओटी भरुन कृतार्थ होते त्याच्या पल्याडही दूरदेशी राहून एका दिवसाच्या रुखरुखीनेही अधिक पावन होतय हे तेवढंच खरय म्हणा..

अफाट आनंदाची जत्रा...

जत्रोत्सवाचा प्रत्येक मालवणवासियांचा आनंद हा अफाट असतो, फरक फक्त एवढाच असतो की आम्ही हे फक्त शब्दात मांडू शकतो.. पण कधीतरी मालवणच्या या जत्रेत सहभागी व्हा, संध्याकाळी सहानंतरचा प्रत्येक क्षण नात्याचे नवे कनेक्शन उलगडत जाते. फक्त गर्दीत उंचावलेला हात तुमचं विदाऊट जीपीआरएस एक्झॅट लोकेशन सांगतं. मोबाईल नसतानाही जत्रेत फिरुन यावेळेला तुमच्या मित्राचे नेमक लास्ट सिन किती वाजता आणि नेमकं कुठं आहे हे तिस-या मित्राकडून समजण्याची गंमत केवळ याच मालवणच्या जत्रेत आहे. आणि बाजार जत्रा म्हणजे खिशातले पैसे संपतात असा ज्यांचा समज आहे त्यांनीही पूर्णपणे भरलेला बाजार असूनही खिशाला कात्री न लागताही जत्राही मजेची, आनंदाची आणि आपल्या माणसांना वेळ देण्याचीही असते या सगळ्या गोष्टी उलगडणा-या ठरतात.


असा रंगतो पालखी सोहळा... 

साधारणपणे दुपारी चारच्या सुमारास हा पालखीसोहळा सुरू होतो. श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण आपल्या मानाच्या गावक-यांसह, वाजतगाजत गावच्या प्रदक्षिणेला निघतो. मंदिरातल्या घंटानादाबरोबर माडपोफळींचे अबदागीर सज्ज होतात. समुद्रावरुन घोंघावत शहरात फिरणारा वारा पालखी येतेय कळल्यावर प्रदक्षिणा मार्गावरुन स्वताच सैरावैरा बेभान होऊन पालखीचा आवाज गावभर फिरवतो.  कुठे चिरेघडणावळीची पाणंद, कुठे शेतमळ्यातला बांध तर कुठे वाळूची पुळण पुनीत करत पालखी गावप्रदक्षिणेला निघते. श्रीदेव भूतनाथ, श्री देव दांडेश्वर, श्रीदेव मोरयाचा धोंडा आणि श्री आई काळबादेवी या समस्त देवतागणांना दिपावलीची शुभ चिंतून मालवणचे साम्राज्य चक्रवर्ती पालखीतून पुढे पुढे सरकतात, तेव्हा पालखीसोबत पाहताना शहर म्हणजे मालवण न राहता माहिष्मती सारखं भव्य दिव्य प्रकाशांचा लखलखाट असलेले आणि या सगळ्याचा सार्थ अभिमान असलेले आपण यांचा एक नजारा सुखावून जातो. 

पालखी सोहळ्याचा नजरा... 

पालखी सरकत राहते आणि पालखी खांद्यावर मिरवण्याचा काही क्षणांचा मान प्रत्येकाला दिवाळीच्या लखलखीत कामना देऊन जातात. भरलेल्या बाजारात एरवी सायकल घालणे हे दुरापास्त असते तिथे मुळात असलेली दाटीवाटी ही पालखीसह येणा-या भाविकांच्या स्वागतासाठी स्वताला एडजेस्ट करते. ही एडजेस्ट दुस-यासाठी नसतेच मुळी, माझ्यासोबत इतरांनाही पालखीचे दर्शन घेता यावे यासाठी प्रत्येकातला भाविकभाव झटत असतो. रामेश्वर मांडावर विराजमान झालेली पालखी आणि तिच्या दर्शऩासाठी पार गोल गोल वळण घेत भंडारी हायस्कूल पर्यंत गेलेली गर्दी हे फार मोठे जत्रा भरली त्याचे एकक आहे. त्यानंतर मुख्य मार्गावर व्यापार उदीम सांभाळणा-या व्यापा-यांना आशीर्वाद देत पालखी सोहळा पुढे सरकतो. प्रत्येत दहा पावलावर स्वागताला येणा-या निरंजन आणि ओटीच्या ताम्हणात एक कृतार्थता असते. हे श्री देव रामेश्वर आणि नारायणा जे दिलंय ते तूच दिलय आणि जे आहे ते केवळ तूच सांभाळतोयस याची जाणीव आहे आणि त्याचा आम्हाला विसर पडू देऊ नकोस. तुझा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत ठेव.. एक विश्वास मिळतो..आपली दोन पावले मागे सरकतात वर्षभर पुढे जाण्यासाठी एक रनअप मिळतो. आणि कर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करणा-या मालवणकरांची देवभक्ती सदोदित प्रज्वलीत राहते याचे गमक म्हणजे हा पालखी सोहळा..

जत्रोत्सवात बदल मांडण्याची गरज... 

पण या निमित्ताने आज पालखी सोहळ्याकडे आज एका वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज झालीय. आणि आज पुढच्या वीस वर्षांचा विचार करता हे कुणीतरी बदलण्याची आणि करण्याची गरज आहे आणि म्हणूनच हा माझा लेखप्रपंच आहे. दरवेळेला धार्मिक प्रथा परंपरा जोपासणे आणि जोपासताना त्यात नाविन्याचा सहभाग करणे म्हणजे प्रथापरंपरेला धक्का लावणे असं मुळीच नाही. आज महाराष्ट्राच्या आषाढवारीत दरवर्षी नवनवीन ड्रोन, कनेक्टव्हीटी, सोशल रिचनेस या सगळ्या गोष्टी नव्या तरुणाईसह वाढतायत.. पण हे जरी असले तरी आज वारकरी रिवाज मात्र चढत्या वाढत्या उत्साहाने विठ्ठलासाठी पायीच निघतोय आणि मुखातही तोच माऊलींचा हरीपाठ आहे. वेगाने होत चाललेल्या बदलाची प्रतिक दिसत असताना या जत्रोत्सवात आपण सगळ्यांनी मिळून बदल मांडण्याची गरज आहे. ही जत्रा जरी शहराची असली तरी व्यापार उदीमासाठी अवघ्य़ा जिल्ह्याला आमंत्रित केले तर भाविकांच्या गर्दीसोबत पर्यटकांसाठी एक इव्हेंट मिळेल. 

मालवणची जत्रा महाराष्ट्रभर मिरवुया...

मुंबईसह महाराष्ट्रातून अनेक पर्यटक दिवाळी साजरी करण्यासाठी दापोली आणि गुहागरमध्ये होम स्टेमध्ये राहून दिवाळी साजरी करतात. त्या पर्यटकांपर्यंत ही दिवाळी आपण पोहोचूया. संस्कृतीने समृद्ध असलेल्या या शहराचा वारसा प्रत्येकाने हॅशटॅग वापरत मालवण जत्रा म्हणून जत्रेचे फोटो सोशल मीडियात व्हाय़रल केले तरी या जत्रेतला गर्दीचा सोहळा पुष्कर पर्वणी एवढाच होईल. माझ्यासारखी एक पिढी दिवाळीत किल्ले आणि वाळूचे शहर मांडत मोठी झाली. आम्ही कधी निवडणूकीला उभे राहिलो नाही पण आमच्या प्रत्येकाच्या नजरेत शहराचा स्मार्ट डिपी प्लॅन तयार असायचा. आज प्रशासकीय यंत्रणेने य़ा मुलांकडून असलेले शहर आणि शहराच्या कुठल्य़ाच आराखड्याला धक्का न लावता शहर सुनियोजित करण्याचे देखावे मागवले ना तरी मुलांकडून अफाट कल्पना येतील आणि हो त्यातील बहुतांशी कल्पना या वास्तवात आचरणात आणण्यासारख्या असतील. मला वाटतं आपण सर्वांनी या जत्रेकडे तळमळीने पाहूया. आणि नव्या बदलांसाठी नवा प्रकाशोत्सव या शहरांसाठी, या जत्रेसाठी निर्माण करुन महाराष्ट्रभर मिरवुया..

अन् चाफा बोलेल...

खरतर हा वर्षभर मनात जपावा असा जत्रा असूनही गुलालाची उधळण किंवा जत्रेसाठी वाटा बंद न करणारा सोहळा आहे. देव नव्या वाटेनं निघतो. त्याच्या वाटेनं निघून आपण स्वताहा नगरप्रदक्षिणा करुया.. क्षणभर पालखीसमोर उभं राहून कृतकृत्य होऊया, अपेक्षा नसतानाही गावकर एखादं सोनचाफ्याचे फुल देतील.. आणि मग हेच सोनचाफ्याचे फुल तुमच्या देव्हा-यात किंवा पाकिटात बोलत राहील तुमच्या प्रत्येक क्षणात.. हरण्याच्या प्रत्येक क्षणी स्वताला या सोनचाफ्याच्या फुलाकडे एकदा विश्वास मागा.. त्याच सुकलेल्या पाकळ्यातून एक आवाज बोलेल, झीला आसय रे मी.. तू चल फुडे..