मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!

शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 2, 2017, 04:49 PM IST
मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!

अण्णासाहेब चवरे, झी मीडिया मुंबई : शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे. 

का घडावे असे?

कोणतेही संकट हे अचानक येत नाही. मग ते नैसर्गिक असो किंवा मानव निर्मीत. ते संकट अगोदर काही संकेत देते. ज्यांना हे संकेत कळतात ते या संकटातून वाचण्याच्या शक्यता कैक पटीने वाढतात. मुंबईसारख्या अतिमहाकाय आणि भौगोलीकदृष्ट्याही अपवाद असलेल्या शहराबाबत तर हे अनेक पटीने खरे आहे. काही महिन्यांपूर्वीचाच किस्सा. मी आणि माझे मित्र डॉ. गजानन अपीने लोकलने प्रवास करत होते. डॉ. गजानन हा खरं म्हणजे सामाजिक भाष्यकार माणूस. सतत काही ना काही चिंतन करत असणारा. सहज बोलता बोलता आमची गाडी मुंबई, विकास, गर्दी आणि जीवनशैली यावर आली. गजानन म्हणाला मुंबईच्या गर्दीवर काही पर्याय असू शकत नाही? मुंबईतील लाखो लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे. पण, मुंबईतील लोकल ट्रेन मर्यादित करा. सर्व गोष्टी बऱ्यापैकी आटोक्यात येतील.

शहर व्यवस्थापन नावाचा प्रकारच नाही.

प्रत्येक शहराची स्वत:ची म्हणून एक मर्यादा असते. मुंबईही याला अपवाद नाही. त्यात नैसर्गिक रचनेमुळे मुंबईच्या मर्यादा अधिक वाढल्या आहेत. मुंबईचा जमीनीवरील विस्तार १०० टक्के संपला आहे. आता मुंबई आढवी वाढू शकत नाही. म्हणून मुंबईचे बकालीकरण करून टॉवर उभे केले जात आहेत. टॉवर उभा करणे आणि मेट्र, बुलेट ट्रेन, विमानतळ या गोष्टी शहरात आणणे म्हणजे विकास नाही. कोणतेही शहर ज्या गतीने धावते त्या गतीने त्या शहरातील गर्दीही वाढत असते. शहरांचा विकास करताना शहरातील नागरीकरण (लोकसंख्या या अर्थाने) नियंत्रीत ठेवावे लागते. हे आव्हान म्हणून स्वीकारावे लागते. मुंबईच्या बाबतीत हे होत नाही. आज आम्हाला बुलेट ट्रेन, विमानसेवा जितकी महत्त्वाची वाटते तितके शहरातील मैदाने, आरोग्यसेवा, जीवनशैली महत्त्वाची वाटत नाही. सरकारही याबाबत गाफील आहे. खरे म्हणजे कोणत्याच सरकारला शहरीकरणाबाबत दृष्टीकोन नाही. चंडीगढ शहर विचारात घेता यात पं. नेहरूंचा अपवाद म्हणावा लागेल.

मुंबईचा विकास राष्ट्रीय पक्ष करू शकत नाहीत

मुंबईच काय देशातील कोणत्याही शहराचा विकास राष्ट्रीय पक्ष करू शकत नाहीत. त्यासाठी प्रादेशिक पक्षांना सत्तेत वाटा मिळणे आणि तो मिळाल्यावर प्रादेशिक पक्षांनी प्रामाणिकपणे कामं करणे हा पर्याय ठरू शकतो. आजची स्थिती पाहत दिल्ली दरबारी असलेल्या केंद्र सरकारला देशातील शहरांचे प्रश्न कळत नाहीत. त्यातही मुंबईतील प्रश्नांची त्यांना जाण नाही. त्यासाठी धोरण ठरविण्यासाठी प्रादेशिक पक्ष आणि ते राबविण्यासाठी केंद्र सरकार असा पर्याय निर्माण केल्यास प्रश्न सुटण्याची शक्यता अधिक. पण, अलिकडच्या सत्तापिपासू राजकारणात हे होणे कठीणच.

खेड्याकडे चला

शहरांना पोसणारी खेडी आज बकाल होत चालली आहेत. खेड्यातली बहुसंख्य जनता शहरांकडे स्तलांतरीत झाली आहे. त्याच परिणाम लोकांच्या कार्यक्षमतेवर झाला आहे. खेड्याकडे कुशल असणारा घटक शहरात येऊन अकुशल कामगार वर्ग बनत आहे. मुळच्या शहरात राहणाऱ्या व्यक्तिला खेड्याबाबत फार आत्मियता दिसत नाही. समाज म्हणून आपण अराजकतेकडे चालल्याचे हे लक्षण आहे. यात पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून खेड्यांकडे पाहिले पाहिजे. खेडी स्वयंभू झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. खेडी बकाल ठेऊन आपण कितीही बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटींच्या कॅशलेस डिजिटल गप्पा मारल्या तरी शहरं सुधारणार नाहीत. उलट ती अधिक बकाल होत जातील. हे नक्की.

चेहरा हरवलेल्या गर्दीचा मुंबईवर बलात्कार

बलात्कार हा केवळ लैंगिक असू शकत नाही. तो व्यवस्थेने व्यवस्थेवर केलेला सामाजिकही असू शकतो. आज चेहरा हरवलेल्या गर्दीत मुंबई धावत आहे. मुंबईचे स्पिरीट या गोंडस नावाखाली मुंबईवर होणारे बलात्कार खपवले जात आहेत. लोकांची विस्कळीत जिवनशैली, खालावत चाललेला राहणीमानाचा दर्जा, अतिप्रमाणात बाहेरून मुंबईवर आदळणारे लोंढे, त्यातून वाढणारी गुन्हेगारी, अपघात, विदीर्ण होत चाललेले कल्चर आणि गरीब श्रीमंत वाढत चाललेली दरी हा सगळा शहरावर होणाऱ्या बलात्काराचाच प्रकार आहे. राजकारणी या बलात्काराचा वापर करून मतांचा जोगवा मागत राहतात. हे विद्रुपीकरण जोवर सुरू आहे तोवर मुंबईत मरण स्वस्तच राहील. त्यात परिवर्तन होणे नाही. ज्या दिवशी हे परिवर्तन होईल ती मुंबईचीच नव्हे देशातील प्रत्येक शहराची सुवर्ण सुरूवात असेल.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close