शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री लावण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीपासून इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शिवाजी महाराज आणि मराठा राजवट हा या नव्या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे आणि मुघल राज्यकर्ते अगदीच नावाला शिल्लक ठेवण्यात आले आहेत.

Updated: Aug 7, 2017, 04:02 PM IST
शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री लावण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीपासून इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शिवाजी महाराज आणि मराठा राजवट हा या नव्या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे आणि मुघल राज्यकर्ते अगदीच नावाला शिल्लक ठेवण्यात आले आहेत.

नव्या अभ्यासक्रमातून ताजमहाल, कुतुबमिनार, लाल किल्ला या वास्तू आणि त्यांचा इतिहास गायब झाला आहे. आधीच्या अभ्यासक्रमात किमान एका परिच्छेदापुरता असलेला अकबर आता नव्या अभ्यासक्रमात तीन ओळींमध्ये संपवण्यात आला आहे. अकबर हा मुघलांमधला सगळ्यात सामर्थ्यवान राजा होता. पण ज्यावेळी त्यानं सगळा भारत अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याच्याविरोधात महाराणा प्रताप सिंह, चांदबीबी आणि राणी दुर्गादेवीनं निकराचा संघर्ष केला असं वर्णन नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

तर आधीच्या अभ्यासक्रमात अकबर हा उदारमतवादी सहिष्णू राजा होता, त्यानं जिझिया कर रद्द केला, सती प्रथा बंद केली आणि तो विधवा विवाहांचा पुरस्कर्ता होता, असं अकबराचं वर्णन करण्यात आलं होतं. आता मात्र अकबराचं हे वर्णन बदलून टाकण्यात आलं आहे. अकबराव्यतिरिक्त  दिल्लीवर सत्ता गाजवणारी पहिली राणी रझिया सुल्ताना, दिल्लीतून दौलताबादला राजधानी हलवणारा आणि नोटबंदी करणारा मुहम्मद बिन तुघलक यांची नावं नव्या अभ्यासक्रमातल्या नव्या इतिहासातून पुसून टाकण्यात आली आहेत.