VIDEO : ...अन् साराने स्वीकारलं 'त्याचं' प्रपोजल

 संकोचलेपणाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता.

Updated: Dec 19, 2018, 01:01 PM IST
VIDEO : ...अन् साराने स्वीकारलं 'त्याचं' प्रपोजल title=

मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सैफच्या लेकीचा अभिनय अनेकांचीच मनं जिंकून गेला. पाहता पाहता पहिल्याच चित्रपटानंतर साराने तिचा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. 

सारा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या म्हणजेच 'सिंबा'च्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. तर, 'केदारनाथ' या चित्रपटाला मिळालेलं यशही ती विविध पद्धतींनी साजरा करत आहे. नुकतंच तिने एका महाविद्यालयीन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांशी तिने अगदी मनमोकळेपणाने संवाद साधल्याचं पाहायला मिळालं.

मुख्य म्हणजे नवखी अभिनेत्री, म्हणून असणारा संकोचलेपणाचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. तिचा दिलखुलास अंदाज विद्यार्थ्यांची मनं जिंकून गेला. अशातच एका मुलाने पुढे येत सैफच्या लेकीला म्हणजेच साराला चक्क प्रपोज केलं. 

महाविद्यालयात सुरु असणाऱ्या कार्यक्रमात तीन विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. ज्यानंतर त्या तिघांपैकी एका मुलाने मोठ्या आत्मविश्वासाने पुढे येत साराला प्रपोज केलं. 'तुझ्याहून सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिलेली नाही', असं म्हणत गुडघ्यांवर बसून त्याने अगदी चित्रपटांत करतात तसंच प्रपोज साराला केलं आणि तिनेही त्याच्या या प्रपोजलचा हसत हसत स्वीकार केला. 

साराचा हाच अंदाज आणि तिचा सर्वांमध्ये असणारा वावर हा सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे. एक अभिनेत्री म्हणून सुरु झालेला तिचा प्रवास पाहता 'क्या बात', असंच म्हणावं लागेल. दरम्यान, 'केदारनाथ'च्या वाट्याला आलेलं यश साजरा केल्यानंतर सारा 'सिंबा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटातून ती अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे.