अजय गोगावले म्हणतो ‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे’

अजय गोगावलेंनी गायले चक्क वेस्टर्न  स्टाईल गाणे

अजय गोगावले म्हणतो ‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे’ title=

मुंबई : गायक अजय गोगावले यांनी आपल्या खास शैलीतील गायकीने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीचा खास पारंपारिक भारतीय संगीताचा लहेजा आहे, मात्र घर आणि घरातील नात्यांचा गोडवा विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटात त्यांनी चक्क एक वेस्टर्न  बाजाचे गाणे गात आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. या गाण्याचे संगीत संतोष मुळेकर यांचे आहे. ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषीकेश जोशी यांनी केले आहे.

‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार संतोष मुळेकर म्हणाले, अजय गोगावले सॉलिड गायक आहेत, त्यांनी आजपर्यंत गायलेली गाणी ही पारंपारिक आणि लोकसंगीताच्या शैलीत मोडणारी आहेत. परंतु ‘होम स्वीट होम’ साठी त्यांनी गायलेले ‘इकडून तिकडे’ हे गाणे त्यांच्या शैलीपेक्षा पूर्णपणे निराळे असे वेस्टर्न शैलीत मोडणारे आहे. ते स्वतः संगीतकार असल्यामुळे समोरच्याला नक्की काय हवे आहे हे समजून घेतात आणि गाण्याला अधिक उंचीवर घेउन जातात. वैभव जोशी यांच्या सुंदर शब्दांमध्येच गाण्याची चाल दडलेली होती, त्यामुळे ती संगीतबद्ध करणे सोपे झाले तर अजय यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत.

‘होम स्वीट होम’ चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हल्पमेंट वर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.