सोनाली म्हणतेय, तरीही दिवाळी साजरी केलीच....

दिवाळी अशीही.....

Updated: Nov 8, 2018, 03:05 PM IST
सोनाली म्हणतेय, तरीही दिवाळी साजरी केलीच....
मुंबई : दिवाळीचा सण हा प्रत्येकाच्याच आयुष्यात एक सकारात्मक उर्जा आणि दृष्टीकोन+ आणणारा ठरतो. असा हा सण अभिनेत्री सोनाली बेंद्रेसाठी जरा जास्तच खास आहे. कॅन्सरशी झुंज देणारी सोनाली तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेच. पण, तिने अद्यापही दिवाळीच्या शुभेच्छा कशा दिल्या नाहीत असा प्रश्नच चाहत्यांच्या मनात घर करत असताना अखेर तिची पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली.
दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोनालीने परदेशात एक लहानशी पूजा केली असून आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा केला. 
यावेळी सोनालीच्या चेहऱ्यावर असणारा आनंद सर्वकाही सांगून जात होता. 
'न्यूयॉर्कमध्ये दिवाळी ही मुंबईच्या बऱ्याच वेळानंतर सुरु झाली. त्यामुळेच शुभेच्छा देण्य़ासही उशिर झाला. ही दिवाळी जरा वेगळी होती. आमच्याकडे भारतीय पद्धतीने पारंपरिक कपडे नव्हते. पण, तरीही आम्ही मनोभावे एक लहानशी पूजा केली', असं कॅप्शन तिने या पोस्टमध्ये लिहिलं. 
आपल्या चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आणि आप्तजनांसमवेत ही दिवाळी साजरी केली असणार, असं म्हणत तिने सर्वांनाच या सणाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टनंतर अनेकांनीच तिला शुभेच्छा देत तिच्या प्रकृतीविषयी पुन्हा प्रार्थना करण्यास सुरुवात केली. 
काही महिन्यांपूर्वीच सोनालीने तिला कॅन्सरने ग्रासल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर ती उपचारांसाठी परदेशी रवाना झाली. सोनालीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशीच प्रार्थना त्या एका दिवसापासून तिचे चाहते करत आहेत. मुख्य म्हणजे परदेशात असूनही सोनाली तिच्या चाहत्यांसोबत असणारं नातं अगदी सुरेखपणे जपत आहे, हेसुद्धा तितकच खरं.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close