कंगनावर विश्वास ठेवणं कठीण, 'या' अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

जाणून घ्या ती नेमकं म्हणाली तरी काय....

Updated: Oct 8, 2018, 11:46 AM IST
कंगनावर विश्वास ठेवणं कठीण, 'या' अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तनाचे आरोप केल्यांनतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तनुश्रीच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बी- टाऊनमध्ये #MeToo चा ट्रेंड पाहायला मिळाला. ज्याअंतर्गत अभिनेत्री कंगना रणौतनेही तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग उघड केला. 

कंगनाने लावलेल्या आरोपांमध्ये तिने 'क्वीन' चित्रपटाचा दिग्दर्शित विकास बहल याच्यावर आरोप करत त्याने आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. 

कंगनाच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा विकास बहलच्या असभ्य वर्णूकीविषयीच्या चर्चांना उधाण आलं. क्वीन कंगनाच्या याच वक्तव्याविषयी अभिनेत्री सोनम कपूरने आता तिचं मत मांडलं आहे. 

बंगळुरू येथे 'वोग, वी द ब्युटी समिट' या कार्यक्रमात तिने तनुश्रीच्या धाडसाचं कौतुक केलं. कलाविश्वातील बड्या प्रस्थांच्या विरोधात आवाज उठवण्याचा तिचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं ती म्हणाली. पण, कंगनाच्या वक्तव्याच्या बाबतीत मात्र ती असं काही बोलून गेली जे पाहता आता नव्या वादाला तोंड फुटतं का, हाच प्रश्न उपस्थित झाला. 

'माझ्यामते कंगनानेसुद्धा काहीतरी लिहिलं आहे. कंगना... अर्थातच कंगना रणौत. ती खुप काही बोलत असते. पण, तिचं बोलणं गांभीर्याने घेणं तसं कठीणच आहे. आपल्या मनाला जे पटतं ते बोलण्याच्या तिच्या स्वभावाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे', असं ती म्हणाली. 

कंगनाच्या वक्तव्याविषयी सांगत ती म्हणाली, 'मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. मला त्यावेळी परिस्थिती नेमकी काय आणि कशी होती याविषयीची काहीच ठाऊक नाही. पण, तरीही तिने जे काही म्हटलंय, लिहिलंय ते खरं असेल तर मात्र त्या व्यक्तीला शिक्षा होणं गरजेचं आहे, हा मुद्दाही तिने उचलून धरला. 

विकास बहलबद्दल काय म्हणाली होती कंगना? 

'२०१४ साली आम्ही जेव्हा क्वीनचं चित्रीकरण सुरु होतं तेव्हा  आपण विवाहीत असूनही कशा प्रकारे विवाहबाह्य संबंध ठेवतो याविषयी विकास माझ्यापाशी बढाया मारत असे. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा विकास माझ्या मानेवर आपला चेहरा ठेवून मला घट्ट धरून ठेवायचा आणि माझ्या केसांचा वास घ्यायचा.  त्याला स्वत:पासून दूर करण्यासाठी मला माझी पूर्ण ताकद लावावी लागत असे' असं कंगनानं म्हटलं होतं.