#MeToo प्रकरणी साजिद खानला मोठा झटका

मिळाली ही अनपेक्षित शिक्षा   

Updated: Dec 12, 2018, 09:35 AM IST
#MeToo प्रकरणी साजिद खानला मोठा झटका title=

मुंबई : बऱ्याच महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या #MeToo प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आल्याचं लक्षात येत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान याच्यावर 'द इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशन' म्हणजेच IFTDA यांच्याकडून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी जवळपास एक वर्षासाठी घालण्यात आल्याची माहिती 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. 

साजिदवर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर बऱ्याच दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. अभिनेत्री रॅचेल व्हाईट, सहाय्यक दिग्दर्शक सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिष्मा उपाध्याय यांनी त्याच्यावर गैरवर्तन आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून या तिघींनीही त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती उघडकीस आणली होती. अभिनेता अक्षय कुमार आणि फरहान अख्तर यांनीही त्यावेळी आरोप करणाऱ्या महिलांना पाठिंबा दिला होता. ज्यानंतर त्याने 'हाऊसफुल्ल ४' या चित्रपटाच्या दिग्दर्शक पदावरूनही काढता पाय घेतल्याचं पाहायला मिळालं. 

'POSH कायद्याअंतर्गत एका समितीने साजिदवर करण्य़ात आलेल्या आरोपांची  पडताळणी केली.  त्याच्यावर करण्यात आलेले आरोप हे अतिशय गंभीर स्वरुपाचे असून, त्याने आपल्याकडे असणाऱ्या हक्कांचा गैरवापर केल्याचंही यातून स्पष्ट झालं', अशी माहिती IFTDA कडून देण्यात आली. 

... आणि #MeTooला उधाण आलं

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्त केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर केले होते. एका मुलाखतीमध्ये तिने तहा गौप्यस्फोट केल्यानंतर सर्वत्रच #MeToo या चळवळीला उधाण आल्याचं पाहायला मिळालं. 

तनुश्रीमागोमाग कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबच घडलेल्या अशाच काही प्रसंगांविषयी खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली होती. यामध्ये अनेक प्रसिद्ध आणि बड्या प्रस्थांचे खरे चेहरेही सर्वांसमोर आले होते.