जीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार

1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय.

Updated: Jun 12, 2017, 09:04 PM IST
जीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार title=

मुंबई : 1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय. मराठी चित्रपटांना या टॅक्समधून पूर्णतः माफी मिळावी अशी मागणी मराठी चित्रपट निर्मात्यांनी केली आहे.

सरकारने राज्यातील मराठी चित्रपटांसाठीचा जीएसटी पूर्णपणे माफ करावा अन्यथा 1 जूलैपासून चित्रपट निर्माते संपावर जातील. एकही मराठी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही, असा इशारा निर्मात्यांनी दिलाय.

मराठी चित्रपट जिवंत ठेवायचा असेल तर यावर त्वरित सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये चित्रपटांना टॅक्स माफ होतो तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल आता मराठी चित्रपट निर्माते विचारू लागलेत. याबाबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देणार असल्याचं मेघराज राजे भोसले यांनी सांगितलं आहे.