Uri: The Surgical Strike | Movie review - युद्ध आमुचे सुरू...

'वक्त आ गया है, खून का बदला खून से लेनेका...'

Updated: Jan 9, 2019, 10:56 AM IST
Uri: The Surgical Strike | Movie review - युद्ध आमुचे सुरू...  title=

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 
दिग्दर्शक : आदित्य धर
निर्माते : रोनी स्क्रूवाला
मुख्य भूमिका : विकी कौशल, मोहित रैना, यामी गौतम, परेश रावल
संगीत दिग्दर्शन : शाश्वत सचदेव 

Uri: The Surgical Strike - 'वक्त आ गया है, खून का बदला खून से लेनेका...', असं म्हणत भारतीय सैन्यदलाने काही वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 'सर्जिकल स्ट्राईक' ही कारवाई केली आणि शेजारी राष्ट्रातून होणाऱ्या दहशतवादी हालचालींना सडेतोड उत्तर दिलं होतं. त्याच घटनेचा आधार घेत हे 'सर्जिकल स्ट्राईक' नेमकं कसं करण्यात आलं होतं यावर 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. भारताच्या सीमांतर्गत भागात होणाऱ्या कारवाया, सैन्यदलातील जवानांना सामना कराव्या लागण्याऱ्या अडचणी आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरमरण येणारे शूर जवान यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकत 'उरी'ची सुरुवात होते आणि 'जिंकू किंवा मरू' या ओळी कशा प्रकारे या जवानांच्या आयुष्याशी नेमक्या जोडल्या जातात याची जाणिवही होते. 

चित्रपटाच्या सुरुवातीलाच, बंदुका, बॉम्बहल्ले, सैन्यदलाचे जवान असं एकंदर वातावरण पडद्यावर पाहायला मिळतं आणि सुरुवात होते, ती एका असामान्य घटनेचे साक्षीदार होण्याची. Officers How is the josh? असं कणखर आवाजात विचारणारा विकी कौशल आणि त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देणारे जवान चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. 

एकिकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांमुळे केंद्र सरकार, गुप्चतर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांचा वाढता ताण आणि परिस्थितीशी दोन हात करत या साऱ्याचं सडेतोड उत्तर कसं द्यायचं याचा विचार करणारी नेतेमंडळी, पंतप्रधान, रक्षामंत्री असं एक राजकीय वर्तुळही चित्रपटात पाहायला मिळतं. सैन्याच्या एका कारवाईसाठीचा बेत नेमका कसा आणि किती लक्षपूर्वकपणे आखला जातो ही बाब चित्रपटात वारंवार अधोरेखित करण्यात आली आहे.

अभिनेता विकी कौशल एक सैन्यदल अधिकारी म्हणून आपल्या कामाप्रतीची आणि त्याच्या वाट्याला आलेल्या 'विहान शेरगिल' या धाडसी अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यात कुठेच कमी पडलेला नाही. देशासाठी लढणारा जवान आणि आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने रडणारा कणखर सैन्यदल अधिकारी पाहून  कुटुंब आणि देश या दोन गोष्टींनाच सर्वस्वी महत्त्व देणाऱ्या विहानला आपल्या आईच्या आजारपणामुळे युद्धभूमीपासून दूर कार्यालयीन कामांना निवडावं लागतं, त्यावेळी त्याच्या मनाची होणारी घुसमटही लक्ष वेधते. 

विकीने साकारलेली 'विहान शेरगिल'ची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेच. पण, त्यासोबतच टेलिव्हिजन अभिनेता मोहित रैना हासुद्धा एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या (विहान शेरगिलच्या बहिणीचा पती आणि विहानचा खुप जवळचा मित्र) भूमिकेतही तितकाच प्रभावी वाटतो. 

अधिकाऱ्यांचं प्रभावी व्यक्तीमत्वं, त्यांच्या वावरण्यात असणारा रुबाब आणि सळसळणाऱ्या रक्तात वाहणारा देशाभिमान चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात विविध रुपांमध्ये पाहायला मिळतो. दहशतवादी हल्ल्यांच्या खऱ्या ध्वनिचित्रफीती आणि वृत्त वाहिन्यांचे व्हिडिओ वापरत 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' आणखी जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दिग्दर्शकाने यामध्ये नाही म्हणता काहीशी भावनिक बाजू वापरत ती एका महत्त्वाच्या घटनेशी जोडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या पूर्वार्धात पार्श्वभूमीत सुरु असणाऱ्या घटना कथानकाला पुढे आणतात तर, उत्तरार्धात सुरुवात होते ती म्हणजे एका अशा लढाईच्या तयारीची जी शेजारी राष्ट्राच्या घरात जाऊन त्यांनाच अद्दल घडवण्यासाठी लढली जाणार असते. 

राजकीय नजरेतूनही चित्रपटात काही 'महत्त्वाच्या' व्यक्ती, त्यांच्या भूमिका या लक्षपूर्वकपणे हाताळण्यात आल्या आहेत. त्याच वेळी दुसरीकडे युद्धभूमीवर तयारी करणारा 'विहान शेरगिल' आणि त्याला यात साथ देणारे सहकारी जवान, गुप्तचर यंत्रणेत काम करणाऱ्या एका अधथिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणारी यामी गौतम, नौदल वैमानिकाच्या भूमिकेतील किर्ती कुल्हारी ही सारी मंडळी 'उरी....'ला अधिक प्रभावीपणे सर्वांसमोर सादर करण्यास हातभार लावत आहेत. उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थाने 'उरी....'च्या कथानकाला वेग येतो, पाकिस्तानी राजकारण, स्थानिक संघटना, सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये भारतीय सैन्याविषयी होणाऱ्या चर्चा आणि एकंदर वातावरण पाहता पुन्हा एकदा काही घडून गेलेल्या घटना विचारात येतात आणि चित्रपटातही त्यांची झलक पाहायला मिळते. 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये कशा प्रकारे दहशतवाद्यांना आसरा मिळतो, त्यांची एकंदर हल्ल्याची आखणी, शस्त्रसाठा या गोष्टी कशा प्रकारे आणि कुठे ठेवल्या जातात या साऱ्या गोष्टी अधोरेखित करत भारतीय सैन्यदलाच्या कामगिरीवर आणि सर्जिकल स्ट्राईकच्या निर्णावर भर देण्यात आला आहे. शिवाय शत्रूच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी म्हणून मनात सुडाची भावना घेऊन युद्ध भूमीवर उतरणारा विहान (विकी कौशल) कशा प्रकारे सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व करत सीमारेषा ओलांडून शत्रूच्याच भूमीवर जात कशा प्रकारे त्यांना ठार करतो, याचं चित्तथरारक चित्रण 'उरी...'तून करण्यात आलं आहे. 

चित्रपटातील संवाद हे प्रसंगांना अगदी समर्पक असले, तरीही काहीवेळी मात्र त्यातही आवेगाची कमतरता असल्याचं भासतं. पण, कलाकारांचा अभिनय ही उणिवही भरुन काढतं. किर्ती कुल्हारी या चित्रपटात एका लहान भूमिकेत असली तरीही वायूदल वैमानिक म्हणून तिचा वावर आणि आत्मविश्वास दाद देण्याजोगा आहे. कलाकारांचे पोषाख, त्यांचा सैन्यदल अधिकारी, राजकीय नेता किंवा मग एक जबाबदार व्यक्ती म्हणून असणारा वावरही मन जिंकतो. चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि प्रासंगिक गीतं ही कथानकाला अनुसरुन आखण्यात आल्यामुळे तीसुद्धा वेगळी वाटत नाहीत. शेवटच्या काही मिनिटांमध्ये मुळ मुद्द्यावर कथानक पोहोचतं आणि आता पुढे काय होणार? कारवाई कशी होणार? असे असंख्य प्रश्न मनात घर करुन जातात. गोळ्या, बॉम्बहल्ले यांचे आवाज शांततेला भेदून जातात. तर, सैनिकांच्या हालचाली, भीती, शौर्य, आक्रोश आणि चीड या भावना एकाच वेळी अशा काही एकत्र आल्या आहेत, जे पाहता उरी आणि सर्जिकल स्ट्राईक एका चित्रपटातून प्रेक्षकांवर प्रभाव पाडेल हे नक्की. 

- सायली पाटील
SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com