कमल हसन यांचं 'हे' सूचक वक्तव्य ऐकलं का?

जाणून घ्या ते नेमकं म्हणाले तरी काय...

Updated: Nov 8, 2018, 08:57 AM IST
कमल हसन यांचं 'हे' सूचक वक्तव्य ऐकलं का?   title=

मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले अभिनेते कमल हसन यांनी त्यांचा ६४ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यासोबतच आपल्या आगामी कारकिर्दीविषयी एक सुचक वक्तव्यही केलं.

मक्कल नीधी मैय्यम या राजकीय पक्षातर्फे आपण आगामी पोटनिवडणूका लढण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तामिळनाडूतील जवळपास २० विधानसभा मतदार संघांतून निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे. 

'माझ्यामते आता पोटनिवडणूका व्हाव्यात. मी अचूकपणे सांगू शकत नाही की निवडणूका कधी होतील. पण, जर निवडणूका झाल्याच तर मक्कल नीधी मैय्यम या निवडणूकांमध्ये उतरण्यासाठी सज्ज आहे', असं ते म्हणाले. 

आपल्या ६४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तामिळनाडूतील २० मतदारसंघांमध्ये त्यांनी आपल्या पक्षाचे जवळपास ८० टक्के कार्यकर्ते नेमले असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

सर्वसामान्यांची मदत करण्यासाठी म्हणूनच आपण कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.  भ्रष्ठाचार संपला तर, प्रत्येक राज्य शासनाद्वारा उचलल्या जाणाऱ्या पावलांना, योजनांना आणि उपक्रमांना यश येऊन जनतेलाच त्याचा फायदा होईल, असं वक्तव्यंही त्यांनी केलं. 

माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी त्यांना श्रीलंकेतील परिस्थितीविषयीसुद्धा काही प्रश्न विचारण्यात आले. पण, आपल्या देशात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असताना दुसऱ्या देशातील घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यात काहीच अर्थ नसल्याचं सांगत त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला. 

हसन यांचं हे वक्तव्य आणि एकंदरच परिस्थिती पाहता तामिळनाडूमध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला यश मिळणार का, हे आता येता काळ ठरवेल असंच म्हणावं लागेल.