नागराज मंजुळेच्या 'नाळ' सिनेमाचा जबरदस्त टिझर

मनाला हळूवार स्पर्श करणारा टिझर 

मुंबई : गेले कित्येक दिवसांपासून नागराजचा प्रत्येक चाहता त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. नागराज बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन हिंदीत पदार्पण करत आहे. 'झुंड' असं या सिनेमाचं नाव आहे. हिंदीत काम सुरू असताना आता नागराजने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नागराजच्या 'नाळ' या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. नागराज मुंजळे आता आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 

नागराज मंजुळे 'नाळ' या सिनेमाची निर्मिती करताना दिसणार आहे. आणि या सिनेमाचं दिग्दर्शन सुधाकर रेड्डी करणार आहेत. सुधाकर रेड्डी हे नागराजचे मित्र असून मराठीतील ब्लॉक ब्लस्टर सिनेमा सैराटचे ते कॅमेरामन आहेत. नागराजने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याची माहिती दिली असून टिझर रिलिज केला आहे. माझ्या मनातील गोष्ट सुधाकर मांडत असल्याचं नागराज मंजुळेने सांगितलं आहे. त्यामुळे ही गोष्ट पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर असतील यात शंका नाही. 

या सिनेमातील संवाद नागराज मंजुळेने लिहिले असून हा सिनेमा आटपाट आणि मृदूगंध फिल्मसची निर्मिती आहे. हा सिनेमा 16 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना नक्कीच या सिनेमाची ओढ लागली आहे. नागराज आपल्या सिनेमातील नेहमी नवीन कलाकार घेऊन येतो. आता या सिनेमातील एका लहान मुलाची ओळख झाली आहे.