सैराटमधील हा कलाकार 'द ड्रामा कंपनी'त झळकणार

सैराट चित्रपटात आपल्या अभिनयामुळे फेमस झालेला, तानाजी गळगुंडे हा कलाकार 'द ड्रामा कंपनी' या टीव्हीशोमध्ये काम करणार आहे.

Updated: Jun 25, 2017, 12:46 PM IST
सैराटमधील हा कलाकार 'द ड्रामा कंपनी'त झळकणार title=

मुंबई : सैराट चित्रपटात आपल्या अभिनयामुळे फेमस झालेला, तानाजी गळगुंडे हा कलाकार 'द ड्रामा कंपनी' या टीव्हीशोमध्ये काम करणार आहे. त्याच्यासोबत कृष्णा अभिषेक, अली असगर, रिधिमा पंडित आणि सुदेश लहरी या कार्यक्रमात दिसणार आहेत. द कपिल शर्मा शोमधील सुनील ग्रोव्हर हा द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात झळकणार आहे.

कृष्णा अभिषेकचा द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात नानीच्या भूमिकेत प्रेक्षकांना अली असगरला पाहायला मिळाला होता. पण काही महिन्यांपूर्वी कपिल शर्मा आणि त्याची टीम सिडनीला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली होती. 

तिथून परतत असताना कपिलने दारूच्या नशेत सुनील ग्रोव्हरसोबत भांडणे केली होती. त्याचसोबत त्याने अली असगरला देखील अतिशय वाईट शब्दांत सुनावले होते. त्यामुळे अली आणि सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. पण आता अली कृष्णाच्या द ड्रामा कंपनीमध्ये झळकणार आहे.

आता द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात प्रेक्षकांना तानाजी गळगुंडेला पाहायला मिळणार आहे. सैराट या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तानाजी द ड्रामा कंपनी या मालिकेद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.

सुदेश आणि कृष्णा यांची जोडी तर खूपच प्रसिद्ध आहे. त्याचसोबत आता सुदेशची जोडी तानाजीसोबत देखील जमणार आहे. 

द ड्रामा कंपनीत प्रेक्षकांना रिधिमा पंडित देखील दिसणार आहे. रिधिमा पंडित बहू हमारी रजनीकांत या कार्यक्रमामुळे नावारूपाला आली. तसेच सुदेश लहेरी या कार्यक्रमाचा भाग आहे. या सगळ्या कलाकारांसोबत प्रेक्षकांना आणखी काही प्रसिद्ध चेहरे या कार्यक्रमात पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात एका मराठी चित्रपटातील कलाकार देखील दिसणार आहे. सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील परशा आणि आर्ची या व्यक्तिरेखा तर प्रचंड गाजल्या होत्या. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांना या पहिल्याच चित्रपटाने स्टार बनवले. त्यांच्यासोबतच या चित्रपटातील इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या.