द ग्रेट अॅक्टर - चार्ली चॅप्लिन

जन्मदिनानिमित्त आठवण चार्ली चॅपलीनची

शैलेश मुसळे | Updated: Apr 16, 2018, 03:06 PM IST
द ग्रेट अॅक्टर - चार्ली चॅप्लिन

अविनाश चंदने, मुंबई : चार्ली चॅप्लिन, हे नाव जरी उच्चारलं तरी कुणाचीही कळी पटकन फुलते. त्याचे चित्रपट पाहताना हसून हसून पोट दुखू लागतं, तर कधी भावनाविवशही व्हायला होतं. मुकपटाच्या दुनियेतल्या या बादशहानं जगाला अक्षरश: पोटभर हसवलं. १६ एप्रिल हा चार्ली चॅप्लिनचा जन्मदिन. अशा या महान विनोदवीराने २५ डिसेंबर १९७७ रोजी झोपेतच जगाचा निरोप घेतला. पण ४० वर्षांनंतरही चार्ली चॅप्लिनला कुणीही विसरू शकलेला नाही. यापेक्षा त्या कलाकाराचा सन्मान तो कोणता? चार्ली चॅप्लिन म्हणजे मूकपटांचा बादशहाच. केवळ देहबोली आणि चेहऱ्यावरील भाव या दोनच गोष्टी प्रेक्षकांना हसवायला पुरेशा आहेत, हे चार्लीनं जगाला दाखवून दिलं. पण चार्लीला हे सहज साध्य झालं नव्हतं. त्यामागे होते त्यानं गरीबीत आणि अत्यंत कष्टानं काढलेले दिवस. वडिलांच्या निधनानंतर आईनं केलेले कष्ट त्याच्या निरागस बालपणावर असं काही कोरलं गेलं की पुढे त्यानं जगाला हसवण्याचाच विडा उचलला.

रंगभूमीचा वारसा 

चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९चा. त्याचे आईवडील रंगभूमी कलाकार होते त्यामुळे रंगभूमीचा वारसा चार्लीचा आपोआपच मिळाला होता. पण व्यसनामुळे वडील चार्ल्स सीनियर यांचं अवघ्या ३७व्या वर्षी निधन झालं. त्यावेळी चार्ली १२ वर्षांचा होता. त्यातच आईचा आवाज गेल्यामुळे तिला रंगभूमी सोडून कष्टाची कामे करावी लागली. त्यामुळे चार्लीचं बालपण अतिशय कष्टात गेलं. त्या परिस्थितीतही चार्लीने सुरुवातीला पोटाची खळगी भरण्यासाठी रंगभूमीची कास धरली आणि रंगभूमीवर हळूहळू जम बसवताना मूकपटाचा पडदाही गाजवला. चार्ली चॅप्लिननं तब्बल ५३ वर्षे मोठा पडदा गाजवला. त्याचे सर्वच चित्रपट तुफान लोकप्रिय झाले.

स्टाईल जगभरात प्रचंड लोकप्रिय

चार्ली चॅप्लिन म्हटलं तरी समोर उभी राहते ती त्याची कपड्यांची स्टाईल. ही स्टाईल जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. इतकी की अनेक कलाकारांनी चार्लीची स्टाईल स्टेटमेंट आपलीशी केली आहे. तुरुतुरू चालणारा एक मध्यमवयीन माणूस, डोक्यावर हॅट आणि हातात केन, एवढं दिसलं तरी समोर उभी राहते ती चार्ली चॅप्लिनची प्रतिमा. डोक्यावर हॅट आणि हातातील केनशिवाय चार्ली चॅप्लिनची कल्पनाच करता येत नाही. डाव्या हाताने केन फिरवणं आणि उजव्या हातानं हॅट काढून आदबीनं वाकणं हे चार्लीनंच करावं. पण हे एवढंच नव्हतं. चार्लीची आणखी एक खासीयस होती. ती म्हणजे त्याची हिटलर बाजाची मिशी. ही मिशी पुढे त्याची ओळख बनली. इतकी की चार्ली आणि हिटलरछाप मिशी हे समीकरण झालं होतं. पण हिटलरच्या चेहऱ्यावर कठोर दिसणारी मिशी चार्लीच्या चेहऱ्यावर  अत्यंत निरागस दिसायची. किंबहुना चार्लीच्या साधेपणात ही हिटलर बाजाची मिशीच अधिक भर टाकायची.

आपलासा वाटणारा कलाकार

पडद्यावर धम्माल करणारा चार्ली स्वभावाने अत्यंत निरागस होता हे दाखवणारी चार्लीची आणखी एक स्टाईल म्हणजे त्यानं गबाळ्यासारखं घातलेलं जॅकेट आणि  ढगळपगळ पॅन्ट. एकूणच चार्लीचा अवतार गबाळ्यासारखा होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जायचे. चार्ली चॅप्लिनचा सहज, मोकळा आणि निरागस अभिनय, त्याच्या देहबोलीतून प्रगट होणार अस्सल विनोद आणि महत्त्वाचं म्हणजे भावनाप्रधान होण्याचं त्याचं कसब हे सारं काही अविश्वसनीय होतं. त्यातूनच चार्ली चॅप्लिन सामान्य माणसांचा हिरो बनला. ‘द ग्रेट डिक्टेटर’मधील हिटलरसारखी भूमिका, रस्त्यावरच्या मुलाला आधार देणारा ‘द किड’मधला चार्ली, ‘सर्कस’मधील चार्ली अशा नानाविध भूमिका करणारा चार्ली चॅप्लिन सर्वांनाचा आपलासा वाटला. किंबहुना असा चार्ली सर्वांना आपल्यातलाच एक वाटला. जगभरातल्या सिनेमाप्रेमींच्या हृदयावर चार्ली चॅप्लिननं निर्विवाद अधिराज्य केलं आणि आजपर्यंत त्याला कुणीही आव्हान देऊ शकलेलं नाही, यातच चार्ली चॅप्लिनचं यश सामावलं आहे.

'मेकिंग अ लिव्हिग' हा चार्ली चॅप्लिनचा पहिला चित्रपट. त्यानंतर तो लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर आला तो कायमचाच. त्याचे २० मिनिटस् ऑफ लव्ह, इन द पार्क, द गोल्ड रश, अ वूमन, अ बिझी डे, मॉडर्न टाइम्स, लाईमलाईट, हिज फेव्हरेट पास्ट टाइम्स हे आणि असे अनेक सिनेमे गाजले. तर द किड, सीटीलाईट्स, पोलीस, द सर्कस, द ग्रेट डिक्टेटर या सिनेमांनी तुफान लोकप्रियता आणि भरपूर कमाईदेखील केली.

गौरव आणि सन्मान

चार्ली चॅप्लिनच्या १९१४ ते १९६७ या कालावधीतील चित्रपट आणि त्याच्या अभिनयाची दखल घेत ऑस्कर म्हणजे अॅकॅडमी अवॉर्डने त्याला जीवनगौरव पुरस्कारनं गौरवलं. तर ब्रिटिश सरकारने त्याचा ‘सर’ किताबानं सन्मान केला.