'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना भेट

दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 30, 2017, 06:47 PM IST
'ये रे ये रे पैसा' झी स्टुडिओज ची रसिक प्रेक्षकांना भेट title=

मुंबई  : असं म्हणतात, एखाद्याला रडवणं सोपं आणि हसवणं फार कठीण. पण येत्या नववर्षात ही जबाबदारी उचलली आहे. झी स्टुडिओज आणि संजय जाधव यांनी!! दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 

संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे, ये रे ये रे पैसा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. 

नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला सिन्घम, चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल सिरीज् चे हिंदी चित्रपट सृष्टीतले ख्यातनाम दिग्दर्शक रोहित शेट्टी तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यांची विशेष उपस्थिती होती.  

चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. 

आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा. 

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संजय जाधव यांचे असून, संवाद आणि पटकथा अरविंद जगताप यांचे आहेत. 

चित्रपटाचं संकलन केलंय अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी तसेच छायाआरेखन आहे पुष्पांक गावडे यांचं. महेश साळगावकर यांचे कला दिग्दर्शन असून पंकज पडघन यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत अमितराज आणि पंकज पडघन यांनी. 

ये रे ये रे पैसा हे गाणं लिहिलंय सचिन पाठक यांनी तर स्वरबद्ध केलंय प्रवीण कुवर आणि जान्हवी प्रभू-अरोरा यांनी. तर खंडाळ्याचा घाट हे गाणं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्या त्रिकुटाने चित्रीकरणाच्या वेळी लाईव्ह गायले असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे. साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले असून ते वैशाली सामंत यांनी गायले आहे. 

हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.