'स्पर्श वात्सल्याचा' : कुटुंबातील नव्या पाहुण्याचं स्वागत

नवी मालिका 

'स्पर्श वात्सल्याचा' : कुटुंबातील नव्या पाहुण्याचं स्वागत  title=

मुंबई : विविध विषय आणि सादरीकरणातील नावीन्याने अगदी कमी वेळातच झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कॉलेज मधील सोनेरी दिवस ते फॅमिली ड्रामा सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी ही वाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ६ ऑगस्टपासून सादर करणार आहे. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हानेआणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे.

या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा गिरीजा ओक-गोडबोले सांभाळणार आहे. गिरीजाने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. एक अभिनेत्री म्हणून सर्वजण तिचा आदर करतात पण या कार्यक्रमातून प्रेक्षकांना गिरीजाची एक आई आणि जबाबदार पालक म्हणून असलेली दुसरी बाजू सुध्दा दिसणार आहे. ती स्वतः एक आई असून या कार्यक्रमासाठी लागणारी संवेदनशीलता आणि भावनिकता ती योग्यपणे समजू आणि साकारूशकते. या कार्यक्रमाच्या रंजक संकल्पनेतून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळे पहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाविषयीची उत्सुकता दर्शविताना गिरीजा म्हणाली, “स्पर्श वात्सल्याचा या वेगळ्या शैलीच्या कार्यक्रमाचा मी एक हिस्सा आहे आणि कार्यक्रमासाठी मी खूप उत्सुक आहे. नवीन विषयावर आधारीत हा कार्यक्रम प्रेक्षककशाप्रकारे स्वीकारतील हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. एक आई म्हणून मला माहित आहे की पहिलं बाळ आणि पहिल्यांदा पालक बनण्याची भावना किती खास असते ते. या कार्यक्रमातून मी अनेक गोड बाळांना आणि प्रथमचपालक बनलेल्यांना भेटणार आहे. मला आशा आहे की सर्व प्रेक्षक कार्यक्रमाच्या या नव्या कल्पनेला पसंत करतील आणि पाठिंबा देतील."