जयंती विशेष : मराठी चित्रपटांतील ‘दादा’ माणूस

By Annaso Chavare | Last Updated: Tuesday, August 8, 2017 - 19:46
जयंती विशेष : मराठी चित्रपटांतील ‘दादा’ माणूस

अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई :  मराठी भाषेवरील मजबूत पकड, शब्दांचे सामर्थ्य, हजरजबाबीपणा आणि फ्री स्टाईल अभिनय म्हटले की एकच नाव आठवते ते म्हणजे अभिनेता दादा कोंडके. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि बिनदिक्कतपणे समोरच्याला पटवूनही द्यायचा ही त्यांची खास हातोटी. ‘आये’ हा शब्द तर जणू दादांचा कॉपीराईटच. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती म्हणूनच त्यांचे सर्वच चित्रपट सुपरहीट ठरले. अशा या दादांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमत्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा छोटासा आढावा.

Dada Kondke
सौजन्य - यूट्यूब 

दादा कोंडके यांनी मराठीमध्ये जवळपास १६ चित्रपट प्रदर्शित केले. तसेच, त्यांनी हिंदी आणि गुजराती भाषेतही चित्रपट निर्मिती केली आहे. त्यापैकी सोंगाड्या हा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटापासून दादांनी सुरू केलेला चित्रपट प्रवास मोठा रंजक राहिला आहे. ग्रामीण जीवन आणि सर्वसामान्य व्यक्तिरेखा हा त्यांच्या चित्रपटाचा बाज. शहरी जीवन, त्यातून आलेला बकालपणा, ग्रामीण जनतेची शिक्षित वर्गाकडून होणारी कुचंबणा हे त्यांच्या चित्रपटाचे विषय असत.

मराठीत निर्मिती केलेल्या सर्वच चित्रपटात सबकुछ दादाच असत. अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच कामे ते स्वत: करत. मात्र, त्यांचा मोठेपणा असा की, सर्व कामे स्वत: करूनही त्याचे श्रेय ते एकटे कधीच घेत नसत. तर सोबतच्या मंडळींना त्याचे श्रेय ते देत असत. त्यांच्या चित्रपटांमध्ये झळकणाऱ्या पाट्यांमधूनही ते दिसते. 

Dada Kondke
सौजन्य - यूट्यूब

सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. पण दादांनी चित्रपटात स्वत: काम केले असले तरीही मुळात ते स्टेज कलाकार आहेत. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. यशवंतराव चव्हाण, पुलं देशपांडे, बाळासाहेब ठाकरे, प्र. के. अत्रे यांच्यासारखे दिग्गज त्यांच्या अभिनयाचे चाहते होते.

एका गिरणी कामगाराच्या पोटी लालबागमध्ये दादांचा जन्म झाला. ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. जे पूढे महाराष्ट्रभर किर्तीमान झाले.. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

 

दादांचा राष्ट्र सेवा दलाशी खास जिव्हाळ्याचा संबंध होता. आपल्या आयुष्यातील काह वर्षे त्यांनी सेवा दलात काढली. पुढे दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती चित्रपटातून त्यांनी चित्रपट अभिनयात पाऊल ठेवले. त्यांचे जवळपास सर्वच चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. मराठीतील या महान अभिनेत्याचे  १४ मार्च १९९८ साली निधन झाले.

First Published: Tuesday, August 8, 2017 - 19:46
comments powered by Disqus