कर्नाटकमध्ये भाजपचा गेम करण्यासाठी काँग्रेसने फोनवरच आखला प्लान

कर्नाटक: भाजपच्या पराभवाची इनसाईड स्टोरी..

Updated: May 21, 2018, 08:41 AM IST
कर्नाटकमध्ये भाजपचा गेम करण्यासाठी काँग्रेसने फोनवरच आखला प्लान

नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये भाजपचा सत्ताविस्ताराचा आक्रमक वारू रोखण्यास अखेर काँग्रेसला यश आले. भलेही काँग्रेसला कायदेशीर लढाई लढावी लागली. पण, काँग्रेसने ते करून दाखवले. पण, सर्वांगाने ताकदवान असलेल्या सत्ताधारी भाजपला टक्कर देणे ही साधी बाब नव्हती. त्यासाठी काँग्रेसला अत्यंत वेगाने पण तितक्याच संयतपणे व्युव्हरचना करावी लागणार होती. ही आखणी करायलाही काँग्रेसकडे विशेष वेळ नव्हता. अशा वेळी काँग्रेसच्या धुरीणांनी जी आखणी केली फार रंजक आहे. भाजपचा गेम करण्यासाठी काँग्रेसने फोनवरच आखला प्लान. त्याचे झाले असे.....

सुत्रे हालली बंगळुरूमधून पण, आखणी झाली दिल्लीतून

कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. कारण, भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. हा कालावधी आहे साधारण १४ ते १९ मे दरम्यानचा. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चा उघडला होता. अर्थात कर्नाटकात सत्तेत काँग्रेसच होती. या राजकीय नाट्याचे केंद्र तर बंगळुरू होते. पण, या केंद्रात चालणाऱ्या डावपेचांची आखणी राजधानी दिल्लीतून केली जात होती. मतमोजणीच्या एक दिवस आगोदर दिल्ली येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत आणि सी वेणुगोपाल हे एकमेकांना भेटले होते. सूत्रांची माहिती अशी की, कर्नाटकात साधारण निकाल काय लागू शकतो याची काँग्रेस नेतृत्वाला आगोदरच कल्पना आली होती. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसला जर बहुमत मिळाले नाही. तर, भाजपला रोखण्यासाठी जेडीएसला विनाअट पाठिंबा दिला पाहिजे, असा विचार पुढे आला.

... आमदारांना बंगळुला हजर करा

दरम्यान, १४ मेच्या सकाळीच काँग्रेसचा प्रस्ताव (पाठींबा) जेडीएसकडे विचारार्थ पाठविण्यात आला. काँग्रेसच्या मनिका टागोर, पीसी विष्णुनाथ, मधु याशकी गौड, सेक सैलजानाथ आणि यशोमती ठाकुर या सर्व पाचही सचिवांना प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी अत्यंत दक्ष राहण्यास सांगण्यात आले. मतदानाच्या दिवशी जसाही निकाल जाहीर होऊ लागला आणि जनतेचा कौल हाती येऊ लागला तसतसे काँग्रेस सूत्रांकडून सचिवांना आदेश गेले. जिंकलेल्या सर्व आमदारांना संपर्क करा आणि त्यांना बंगळुरूला हजर करा.

कायदेशीर लढाई लढणार कोण?

साधारण १५ मे हा दिवस तर मतमोजणी आणि विजयाच्या आनंदातच साजरा केला गेला. खरे नाट्य सुरू झाले १६ मे पासून, कर्नाटकात येडियुरप्पांच्या रूपाने भाजप सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहे. त्यासाठी ते राज्यपालांकडेही जाऊ शकतात. हे ध्यानात येताच काँग्रेस आळस झटकून कामाला लागली. काँग्रेसला पूर्ण अंदाज आला भाजपला रोखायचे तर कायदेशीर लढाई लढावी लागू शकते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही जावे लागू शकते. पण, काँग्रेससमोर प्रश्न होता तो हा की, न्यायालयीन लढाई लढणार कोण? कारण, काँग्रेसच्या वतीने कायदेशीर बाजू लढणारे अभिषेक मनू सिंघवी होते चंडीगडमध्ये.

पिटिशनचा ड्रफ्ट फोनवरच तयार

अभिषेक मनू सिंघवी यांचे फोन सातत्याने खणखणू लागले. अहमद पटेल आणि सुरजेवाला त्यांना सातत्याने फोन करत होते. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या याचिकेचा ड्राफ्ट फोनवरच तयार करण्यात आला. कर्नाटक काँग्रेसचे बडे नेते एम बी पाटील यांनाही संपर्क करण्यात आला. ते कर्नाटकमधील कायदेशीर बाजू पाहात होते. सिंघवी यांनी आपल्या ज्यूनियर वकिलांसोबत चर्चा केली. त्यासाठी त्यांनी देवतत्त कामत यांची मदत घेतली.  कामत यांनी सिंघवी यांना उत्तराखंड प्रकरणात मदत केली होती. 

थेट चार्टर्ड विमानाने सिंघवी पोहोचले दिल्लीला..

दरम्यान, सिंघवी यांना तातडीने दिल्लीला यायला सांगितले. पण, गंमत अशी की तोपर्यंत चंडीगड विमानतळ बंद झाले होते. आता दिल्लीला येण्यासाठी सिंघवी यांनी ट्रेनचा पर्याय निवडला असता तर, जवळपास मध्यरात्र उलटून गेली असतो. मग त्यांच्यासाठी एक चार्टर्ड फ्लाईट पाठवण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजता सिंघवी विमानात बसले ६.३० वाजता ते दिल्लीत पोहोचले. विमानातून उतरताच ते थेट १५ गुरूद्वारा रकाबगंज रोड येथील काँग्रेच्या वॉररूमध्ये पोहोचले. तोपर्यंत येथे काँग्रेसचे काही लढवय्ये आगोदरच पोहोचले होते. यात पी चिदंबरम, रणदीप सुरजेवाला, विवेक तन्खा आणि कपिल सिब्बल ही मंडळी होती. याच ठिकाणी बसल्या बैठकीला सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याच्या याचिकेचा फायनल ड्राफ्ट तयार करण्यात आला. ज्याचा प्राथमिक मसूदा फोनवर चर्चा करूनच तयार करण्यात आला होता.