मुंबईत वाढतेय वंध्यत्वाचे प्रमाण...

मुंबईत वंध्यत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या ५ वर्षात ३२ हजाराहून अधिक लोक गर्भधारणेसाठी कृत्रिम (आयव्हीएफ) पद्धतीचा वापर करत असल्याची बाब उघड झाली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 22, 2017, 03:42 PM IST
मुंबईत वाढतेय  वंध्यत्वाचे प्रमाण...  title=

मुंबई : मुंबईत वंध्यत्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या ५ वर्षात ३२ हजाराहून अधिक लोक गर्भधारणेसाठी कृत्रिम (आयव्हीएफ) पद्धतीचा वापर करत असल्याची बाब उघड झाली आहे.

बदलेल्या जीवनशैलीचे परिणाम :

२०१२ पासून आतापर्यंत कृत्रिम गर्भधारणेची ३२ हजार ९०० प्रकरणे समोर आली आहेत. यावरून मुंबईत वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बदलेली जीवनशैली, लग्न होण्यास होणारा विलंब त्याचबरोबर पती-पत्नी एकमेकांना पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच कृत्रिम गर्भधारणा करण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढत आहे. परिणामी मुंबईत कृत्रिम गर्भधारणा केंद्रांची संख्याही वाढू लागली आहे.  मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवाडीनुसार मुंबईत २०१२ मध्ये ३,९६१ कृत्रिम गर्भधारणा झाल्या होत्या. २०१६ मध्ये या संख्येत वाढ होवून तिचे प्रमाण ८,३१३ इतके झाले. 

आजची जीवनशैली अधिक धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. अवेळी जेवणे, पुरेशी झोप न मिळणे, जागरण, व्यसन या सगळ्याचा वाईट परिणाम शुक्राणूंवर होतो. परिणामी गर्भधारणेसाठी कृत्रिम पद्धतीचा पर्याय निवडावा लागतो, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितलं. पती-पत्नीकडे एकमेकांसाठी पुरेसा वेळ नसल्याने वैवाहिक जीवनात हवी तशी ओढ राहत नाही. त्यामुळे मुलं देखील उशिरा होतात, असेही त्या म्हणाल्या. 

कृत्रिम गर्भधारणेच्या प्रमाणात वाढ :

वयानुसार शरीरात बदल होत जातात. उशिरा लग्न झाल्याने शारीरिक व्याधी वाढण्याची शक्यता देखील बळावते. त्यातच वजन वाढल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होतात, असं डॉ. निखिल दातार यांनी स्पष्ट केलं. तर ताण तणाव याचा देखील फर्टिलिटीवर परिणाम होतो असे मनोविकार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महिलांमध्ये ताणतणाव वाढल्यास शरीरात कॉर्टिसॉयल नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं. त्याचा मासिक पाळीवर परिणाम होऊन गर्भधारणेवर विपरीत परिणाम होतो, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. 
कृत्रिम गर्भधारणेच्या प्रमाणात वाढ झाले असले तरी त्यात यश येण्याचे प्रमाण फक्त २५ % इतके आहे.