वातावरणातील बदलामुळे येणारा ताप आणि स्वाईन फ्लू यातील नेमका फरक कसा ओळखावा ?

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे अनेक बळी जात आहेत. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 11, 2017, 05:33 PM IST
वातावरणातील बदलामुळे येणारा ताप आणि स्वाईन फ्लू यातील नेमका फरक कसा ओळखावा ?
स्वाईन फ्लू च्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे अनेक बळी जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आजाराचे निदान उशिरा होते. त्याचबरोबर अनेकदा ताप आल्यानंतर व्हायरल फिव्हर किंवा वातावरणातील बदलामुळे येणारा ताप आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळे त्याकडे तितक्या गंभीरतेने पाहिले जात नाही. म्हणून, त्यातील नेमका फरक कोणता, स्वाईन फ्लूची लक्षणे कोणती, या आपल्या मनातील प्रश्नांवर मुंबईच्या फोर्टीज हॉस्पिटलचे एचओडी आणि जनरल मेडिकल स्पेशालिस्ट डॉ. प्रदीप शहा यांनी मार्गदर्शन केले. 
अंगदुखी, डोकेदुखी, ताप, सतत नाकातून पाणी वाहणं ही वातावरणातील बदलामुळे येणाऱ्या तापाची लक्षणे आहेत. स्वाईन फ्लू हा तापाचाच प्रकार असल्याने त्याची लक्षणे देखील साधारणपणे सारखीच असतात. परंतु, त्यात काही सुक्ष्म फरक असतो. स्वाईन फ्लूची लक्षणे अधिक गंभीर असून ती ४-५ दिवस राहतात. 
ताप येतो तेव्हा अंग, स्नायू दुखू लागतात. डोकेदुखी आणि कफ देखील जाणवतो. त्याचबरोबर नाकातून सतत पाणी वाहणे, घसा खवखवणे, दुखणे असे त्रास होऊ लागतात. अनेकजण ताप, सर्दी, खोकला याकडे तितक्या गंभीरतेने बघत नाहीत आणि वातावरणातील बदलामुळे त्रास होत असेल असा विचार करतात. कफ आणि सर्दी यामुळे फुफ्फुसांचे किंवा श्वसनमार्गाचे आजार होतात. श्वसनमार्गाचे आरोग्य बिघडते, फुफ्फुसांचे आजार होतात आणि व्हायरल फिव्हरला सामोरे जावे लागते. 
एका ठराविक भागातून (जिथे स्वाईन फ्लूची साथ आहे असा भाग) काही रुग्ण आल्यास आणि त्यांच्यात लक्षणे गंभीर स्वरूपात दिसून आल्यास स्वाईन फ्लू असण्याची शक्यता असते. म्हणून स्वाईन फ्लूची साथ असलेल्या भागात आजाराचे निदान करण्यासाठी PCR test करण्याचा सल्ला दिला जातो. ६-१२ तासात त्याचा रिपोर्ट मिळतो. स्वाईन फ्लूचे निदान झाल्यास लगेचच उपचार केले जातात. म्हणून जर तुम्हाला कोणतीही स्वाईन फ्लूची लक्षणे आढळ्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका आणि लक्षणांकडे दुर्लक्ष देखील करू नका.