'या' टिप्सने ऑफिसमध्येही राखा तुमचे आरोग्य!

आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपले आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहोत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 16, 2018, 03:15 PM IST
'या' टिप्सने ऑफिसमध्येही राखा तुमचे आरोग्य! title=

नवी दिल्ली : आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपले आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहोत. दिवसाचे ८-१० तास  आपण ऑफिसमध्ये असतो. ऑफिसमध्ये अधिकतर लोक कंम्प्युटर स्क्रिनसमोर बसून काम करतात. ऑफिसनंतर आपण मोबाईलला चिकटून बसतो. इकतंच काय तर घरी जेवत असतानाही आपण मोबाईल आणि टी.व्ही बघत असतो. 

या सगळ्यामुळे कशाचे नुकसान होत असेल तर ते म्हणजे आपल्या आरोग्याचे. आपले शरीर आजारांचे घर तर होणार नाही ना ? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ताण-तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी काही खास टिप्स...

मध्ये मध्ये ब्रेक घ्या

आजकाल ५ दिवसांचा कामाचा आठवडा असल्याने कामाचे ९ तास झाले आहेत. मात्र हे ९ तास वाढून १०-११ तास सहज होतात. त्यामुळे मध्ये मध्ये ब्रेक घेणे गरजेचे आहे. ब्रेक घेऊन ऑफिसमधून बाहेर पडा. मोकळ्या हवेत फिरा. थोडे चाला. लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. कारण सतत बसून राहिल्याने चरबी वाढते आणि शरीर आखडते. 

डोळ्यांची काळजी घ्या

आजकाल आपण सातत्याने कंप्म्युटर, मोबाईल किंवा टी.व्ही. स्क्रिनसमोर असतो. त्यामुळे डोळ्यांचे विविध त्रास जाणवू लागतात. त्यामुळे ब्रेक घेऊन डोळ्यांना आराम द्या. डोळ्यांवर पाणी मारून डोळे साफ करा.

आहारात फळांचा समावेश करा

आपल्या जीवनशैलीमुळे आपल्या जेवणाचे, खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. त्याचबरोबर आपण चहा-कॉफीचे अधिक प्रमाणात सेवन करायला लागले आहोत. म्हणून काहीही गंभीर होण्याची वाट पाहू नका. आतापासूनच वेळेत खा. योग्य ते खा. 

निसर्गाशी मैत्री

घर-ऑफिस आणि ऑफिस-घर इतकेच आपले जग झाले आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात फारसा वेळ आपण घालवत नाही किंवा तितका वेळच आपल्याकडे नसतो. त्यामुळे ऑफिसमधून मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्या आणि मोकळ्या हवेत फिरा. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवा.