मुख्यमंत्र्यांच्या घरातच भाजप - आप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली.

Updated: Jan 30, 2018, 02:30 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या घरातच भाजप - आप कार्यकर्ते एकमेकांना भिडले title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली.

दिल्लीत सध्या व्यापाऱ्यांच्या विरोधातल्या सिलिंगचा मुद्दा गाजतोय. त्याबाबत दिल्ली सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीला येणार होतं.

मात्र, भाजपचं शिष्टमंडळ पोहोचण्याआधीच तिथं आम आदमी पार्टीचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तिवारी यांनी बोलायला सुरूवात करताच 'आप'च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. 

त्यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. भाजपच्या शिष्टमंडळाला आप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तसंच महिला महापौरांसोबत गैरवर्तणूक केली, असा आरोप भाजपनं केलाय. 

याप्रकरणी भाजपनं आपचे आमदार जर्नेल सिंह, जितेंद्र तोमर, अखिलेश त्रिपाठी, संजय झा यांच्याविरोधात सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सिलिंगच्या मुद्यावरून केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय.. तर या मुद्यावर भाजपला बंद दाराआड चर्चा करायचीय, असा प्रत्यारोप केजरीवालांनी केलाय.