Madhya Pradesh Assembly elections 2018 : सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सज्ज, पण....

बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला एकूण ११६ जागांची गरज आहे.

Updated: Dec 12, 2018, 10:22 AM IST
Madhya Pradesh Assembly elections 2018 : सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सज्ज, पण....  title=

मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल पाहता भाजपा सरकारला चांगलाच धक्का लागला आहे. मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीच्या निकालांमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही मोठ्या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळाली. मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाली असून, कल हाती आले आणि पाहता पाहता मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालं. पण, अद्यापही ही मतमोजणी सुरू असून एकूण तीन जागांचे निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे बहुमतासाठी कोणत्या पक्षाचं पारडं जड असणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 

सध्याच्या घडीला मध्यप्रदेशमध्ये अतितटीची लढाई पाहायला मिळत असून बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला एकूण ११६ जागांची गरज आहे. ही एकंदर संख्या आणि सुरु असणारी मतमोजणी पाहता काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे नेमकी ही मॅजिकल फिगर अर्थात जादुई आकडा कोणता पक्ष ओलांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत बहुमतासाठी लढाई सुरु असून सद्यस्थितीला भाजपाकडे १०८ जागा आहेत. तर, काँग्रेसकडे एकूण आमदारांची संख्या ११५ असून बहुमतासाठी आता फक्त एका जागेची गरज आहे. 

एकिकडे मतमोजणी सुरू असतानाच समाजवादी पक्षाच्या आमदाराने काँग्रेसला पाठींबा दिल्यामुळे याता फायदाच काँग्रेसला होणार आहे. त्यातही सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं कमलनाथ यांनी एका पत्रकाद्वारे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता अंतिम तीन जागांच्या निकालांकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे.  

मध्यप्रदेशात काँग्रेसकडे आघाडी असून सर्वात मोठा पक्ष म्हणू आतापर्यंत याच पक्षाची सरशी आहे. असं असलं तरीही भाजपाकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे एकंदरच आजच्या संपूर्ण दिवसभरातील राजकीय घडामोडी आणि सत्तास्थापनेसाठीची पक्षांची रणनिती, युतीचं गणित हेच चित्र पाहायला मिळणार आहे.