नोटाबंदीचा प्रयोग फसल्यामुळे सरकारला रिझर्व्ह बँकेचा पैसा हवाय- चिदंबरम

नोटाबंदीतून घसघशीत निधी मिळेल, असे सरकारला वाटले होते.

Updated: Nov 11, 2018, 06:10 PM IST
नोटाबंदीचा प्रयोग फसल्यामुळे सरकारला रिझर्व्ह बँकेचा पैसा हवाय- चिदंबरम title=

इंदूर: नोटाबंदीच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयोग पूर्णपणे फसला. त्यामुळेच आता सरकार रिझर्व्ह बँकेकडील राखीव निधीवर डोळा ठेवून असल्याची खरमरीत टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली. ते रविवारी इंदूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे म्हटले होते. ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांच्या रूपाने चलनात असलेल्या १५ लाख ४४ हजार कोटी रुपयांपैकी किमान तीन ते चार लाख कोटी रुपये काळ्या पैशांच्या स्वरुपात असावेत, असा अंदाज होता. अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर तशी माहितीदेखील दिली होती. 

मात्र, प्रत्यक्षात ९९.३ टक्के चलन रिझर्व्ह बँकेत परतले. त्यामुळे सरकारला काळ्या पैशाचा रुपात अपेक्षित असलेला घसघशीत निधी मिळाला नाही. ही तूट भरून काढण्यासाठी आता सरकारला रिझर्व्ह बँकेकडील राखीव निधी हवा असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. 

गेल्या साडेचार वर्षात सरकारला रिझर्व्ह बँकेची कोणतीही अडचण वाटत नव्हती. मात्र, आता अचानकपणे सरकारला रिझर्व्ह बँकेची भूमिका खुपत आहे. रिझर्व्ह बँकेमुळे सरकारला मोकळ्या हाताने पैसा उधळता येत नाहीये. परिणामी सरकार रिझर्व्ह बँकेकडील निधीवर डोळा ठेवून असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.