२०१९ ची निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई, हरलो तर देश मागे जाईल- अमित शहा

२०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई आहे.

Updated: Jan 11, 2019, 05:23 PM IST
२०१९ ची निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई, हरलो तर देश मागे जाईल- अमित शहा title=

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे भारताचा विकास आणि भाजपच्या विस्ताराच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणावे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. ते शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी म्हटले की, २०१९ ची निवडणूक ही भारताच्यादृष्टीने निर्णायक आहे. भारताच्या इतिहासात पानिपतची लढाई निर्णायक ठरली होती. या लढाईत अजेयी असा लौकिक असलेल्या मराठा सैन्याचा पराभव झाला. या पराभवामुळे देशाला पुढील २०० वर्षे गुलामगिरीत काढावी लागली. या काळात देश बराच पिछाडीवर पडला. २०१९ ची निवडणूकही एकप्रकारे पानिपतची लढाई आहे. सध्या १६ राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदिनिशी उतरणार आहे. त्यामुळे जनतेनेही नरेंद्र मोदी आणि भाजपला पुन्हा सत्तेत आणावे, अशी हाक अमित शहा यांनी दिली. 

यावेळी अमित शहा यांनी विरोधकांच्या महाआघाडीवरही टीकास्त्र सोडले. विरोधकांकडे नेतृत्वासाठी चेहरा नाही. याउलट नरेंद्र मोदी हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. महाआघाडीचा डोलारा हा पोकळ आहे. २०१४ च्या निवडणुकीत जनतेने पराभूत केलेले सर्वजण केवळ एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येणे ही म्हणजे जनता आणि मोदींची ताकद मान्य केल्याची पोचपावती आहे. महाआघाडी असो की काँग्रेस सगळ्यांना पुन्हा एकदा हरवण्याची वेळ आली आहे, असे शहा यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसेल, असे सर्वजण सांगतात. मात्र, उत्तर प्रदेशमधील सध्याची परिस्थिती पाहता मी सांगेन की, येथे भाजपला ७२ पेक्षा जास्तच जागा मिळतील, असे शहा यांनी सांगितले. यावेळी शहा यांनी मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात राबविलेल्या योजनांचा पाढा वाचला. 

मोदी सरकारच्या काळात गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कामे झाली. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळेच दहशतवाद आणि नक्षलवादाला आळा बसला, असेही शहा यांनी सांगितले. याशिवाय, गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढला. आतापर्यंत भारतीय पंतप्रधान विदेशात गेल्यावर वर्तमानपत्रांमध्ये केवळ त्यांची छायाचित्रे छापून यायची. मात्र, दाव्होस परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिषदेच्या उद्घाटनाचा मान देण्यात आला. ही भारताच्यादृष्टीने अत्यंत गौरवाची बाब होती. पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताची भूमिका कशाप्रकारे मांडायची याचा उत्तम वस्तूपाठ घालून दिला, असेही शहा यांनी सांगितले.