बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करा- अमित शहा

स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाल प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर होता.

Updated: Jan 22, 2019, 03:42 PM IST
बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधान करा- अमित शहा title=

कोलकाता: आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त देशाचेच नव्हे तर पश्चिम बंगालचे भवितव्य निश्चित करणारी आहे. त्यामुळे बंगालला वाचवायचे असेल तर लोकसभेच्या किमान २३ जागांवर भाजपला विजयी करा. 'ममता सरकारला हटवा, मोदी सरकार आणा', असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले. ते मंगळवारी मालदा जिल्ह्यातील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. २०१९ ची निवडणूक केवळ दोन पक्षांमधील लढाई नाही. ही निवडणूक बंगालची संस्कृती नष्ट करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला हरवण्यासाठीची निवडणूक आहे. अशावेळी तुम्हाला संस्कृतीरक्षक भाजप हवा की संस्कृती नष्ट करणारी तृणमूल काँग्रेस हवी, याची निवड जनतेनेच करावी, असे अमित शहा यांनी सांगितले. 

यावेळी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये रथयात्रेसाठी परवानगी न दिल्याच्या मुद्द्यावरूनही ममता यांना लक्ष्य केले. ही रथयात्रा निघाली तर आपल्या सरकारची अंत्ययात्रा निघेल, याची ममतांना कल्पना आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी घाबरून रथयात्रेला विरोध केल्याचे शहा यांनी म्हटले. 

आपल्या भाषणात अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेवरूनही तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाल प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर होता. कला, संस्कृती आणि प्रत्येक क्षेत्रात बंगालचा दबदबा होता. मात्र, कम्युनिस्ट पक्षांची दीर्घ राजवट आणि आताच्या तृणमूल सरकारमुळे बंगालची अधोगती झाली आहे. एकेकाळी बंगालचा औद्योगिक विकासदर २७ टक्के होता. आता तो ३.३ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. बंगालमधील प्रत्येक पाचवा माणूस दारिद्य्ररेषेखाली असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.