भ्रष्टाचार प्रकरणात जीएसटी परिषदेचे अधीक्षक मल्होत्रा यांना अटक

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 3, 2017, 10:26 PM IST
भ्रष्टाचार प्रकरणात जीएसटी परिषदेचे अधीक्षक मल्होत्रा यांना अटक title=

नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात नव्याने स्थापन झालेल्या जीएसटी करासंदर्भात तुम्हाला माहिती असेलच. मात्र, आता याच जीएसटी परिषदेचे अधीक्षक मनीष मल्होत्रा यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने त्यांच्या भ्रष्टाचाराचा खटला दाखल करून गुरुवारी अटकेची कारवाई केली. मल्होत्रा यांनी आपल्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या मार्फत लाच घेतली असा आरोप आहे. मनीष मल्होत्रा यांच्याव्यतिरिक्त कथित मध्यस्थ मानस पात्रा यालाही अटक करण्यात आली आहे.

मानस पात्रा याला सीबीआयने बुधवारी संध्याकाळी अटक केली होती त्यानंतर आता मनीष मल्होत्रा यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने जीएसटी कौन्सिलच्या अधिका-याला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मानस पात्रा एक कर सल्लागार असून मल्होत्रा यांच्या निर्देशानुसार, त्याने विविध खासगी कंपन्या आणि संस्थांकडून लाच घेतली आहे. तसेच ही लाच घेण्याच्या बदल्यात व्यापा-यांवर कुठलीही कारवाई केली जात नव्हती अशी माहिती समोर आली आहे.

सीबीआयच्या नुसार, लाच स्वरुपात घेतलेले पैसे लपविण्यासाठी केंद्रीय अबकारी कर विभागात काम केलेल्या पात्राने सर्व रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करत असे. त्यानंतर ही रक्कम मल्होत्रा यांची पत्नी आणि मुलीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करत असे.