नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडलं पक्षाचं कार्यालय

काँग्रेसनं कर्नाटक निवडणुकांसाठी २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Updated: Apr 17, 2018, 06:07 AM IST
नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडलं पक्षाचं कार्यालय  title=

बंगळुरू : काँग्रेसनं कर्नाटक निवडणुकांसाठी २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोष पाहायला मिळाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपामध्ये गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. एवढच नाही तर मंड्यामध्ये कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हंगामा केला. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्षाच्या कार्यलयात जाऊन जोरदार तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी यादी विरोधात आंदोलनही केलं.

सिद्धारमैय्या यांच्यावर गंभीर आरोप

मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांनी जवळच्या नेत्यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जेव्हा यादी जाहीर झाली तेव्हा या नेत्यांची नावं नव्हती. सिद्धारमैय्या यांनी काँग्रेसला घरचा पक्ष बनवला आहे. स्वत:च्या कुटुंब आणि नातेवाईकानांच तिकीट देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

मांड्याशिवाय मंगळुरु, नेलामगाला याठिकाणीही पक्ष कार्यालयाची तोडफोड झाल्याची बातमी आहे. काही नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री निवासाबाहेरही आंदोलन केलं आहे.

चामुंडेश्वरीतून निवडणूक लढणार सिद्धारमैय्या

काँग्रेसनं कर्नाटकमधल्या २२४ पैकी २१८ ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये चामुंडेश्वरीतून सिद्धारमैय्या स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा डॉ. यतींद्रला तिकीट देण्यात आलं आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष परमेश्वर यांना कोराटेगरेतून उमेदवारी मिळाली आहे.

सिद्धारमैय्या यांनी आरोप फेटाळले

मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. जिंकून येतील अशांनाच तिकीट देण्यात आली आहेत. तिकीट वाटपामध्ये कोणताही पक्षपात करण्यात आलेला नाही, असं सिद्धारमैय्या म्हणाले आहेत. 

Karnataka