राम रहीमच्या डे-यात ६०० जणांना गाडल्याचा संशय

दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीर राम रहीमच्या डे-याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Updated: Sep 20, 2017, 01:57 PM IST
राम रहीमच्या डे-यात ६०० जणांना गाडल्याचा संशय title=

सिरसा : दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या गुरमीर राम रहीमच्या डे-याबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपासना इंसा आणि डे-याचा उपाध्यक्ष डॉ. पीआर नॅन यांची हरियाणा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांना आशा आहे की, या दोघांकडून डे-या संबंधीत अनेक पुरावे हाती येऊ शकतात. पोलिसांना तपासादरम्यान असाही सुगावा लागलाय की, सिरसा येथील डेरा मुख्यालयाच्या जमिनीत आणि शेतात साधारण ६०० पेक्षा जास्त लोकांची हाडे आणि सांगाडे पुरले आहेत. 

डॉ. पीआर नॅन ने एसआयटीसमोर तसे स्विकारही केले आहे. डॉ. नॅनने पोलिसांना सांगितले की, डे-यात मोक्ष मिळवण्यासाठीही मॄतदेह गाडले जात होते. भाविकांमध्ये असा विश्वास होता की, डे-याच्या जमिनीत त्यांचा मृतदेह दफन केल्यास त्यांना मोक्ष मिळेल. याच कारणाने डे-याच्या जमिनीत ६०० लोकांच्या अस्थी आणि सांगाडे आहे. 

दरम्यान, लोकांना मारून त्यांचे मृतदेह इथे पुरले जात असतील, अशा अंगानेही पोलीस तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहीनीवर बोलताना डे-याच्या काही माजी अनुयायांनी दावा केला होता की, डेरा प्रमुखांविरोधात आवाज उठवणा-यांना मारून त्यांचे मृतदेह डे-याच्या जमीनीत पुरले जात होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीनीतील सांगाडे बाहेर काढण्यासाठी लवकरच कारवाई सुरू केली जाईल. दुसरीकडे डे-याचे अनेक गुपितं जाणून घेण्यासाठी राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. सध्या तिचा शोध नेपाळमध्ये घेतला जात आहे.