आपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!

कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय. 

Updated: Oct 20, 2017, 06:34 PM IST
आपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!  title=

मुंबई : कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय. 

'यूएएन' क्रमांकामुळे नोकरदार वर्गाला नोकरी बदलल्यानंतर भविष्य निधि खात्याचा क्रमांक बदलण्याची गरज राहत नाही.

'ईपीएफओ'नं दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या पूर्वसंध्येला ईपीएफओनं ही सुविधा सुरू केलीय. यामुळे सदस्यांना चांगल्या आणि जलद गतीनं ईपीएफओकडून सेवा मिळू शकतील.

ही सुविधा ईपीएफओची अधिकृत वेबसाईट  ‘www.epfindia.gov.in >> Online Services >> e-KYC Portal>> LINK UAN AADHAAR’  वर उपलब्ध करून देण्यात आलीय.

काय आहे प्रक्रिया...

आपला यूएएन आधारला जोडण्यासाठी सदस्याला आपला यूएएन क्रमांक अगोदर द्यावा लागेल. त्यानंतर या क्रमांकाशी निगडीत मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल.

ओटीपी मिळाल्यानंतर सदस्यांना आपला आधार क्रमांक द्यावा लागेल. यानंतर आणखी एक ओटीपी आधारशी निगडीत मोबाईल, ई-मेलवर पाठवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला यूएएन क्रमांक आधारला जोडता येईल. 

आधार क्रमांक जोडला गेल्यानंतर सदस्य आधारशी निगडीत ऑनलाईन ईपीएफओ सेवांचा लाभ घेऊ शकतील.