GSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल

जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Updated: Aug 21, 2017, 09:51 PM IST
GSTच्या पहिल्या रिटर्न फाईलनंतर सरकारला मिळाला एवढा महसूल title=

नवी दिल्ली : जीएसटी लागू झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात सरकारला ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत रिटर्न फाईल होणार असल्यामुळे या महसुलामध्ये आणखी वाढ होणार आहे. एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये विकल्या गेलेल्या वस्तूंमुळे १५ हजार रुपयांचा कर जमा झाला आहे तर तंबाखू आणि कार यांच्यावरच्या करामुळे ५ हजार कोटींचा महसूल मिळाला आहे.

याचबरोबर केंद्र जीएसटी आणि राज्य जीएसटीमधून २२ हजार कोटी रुपयांचा कर मिळाला आहे. ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकारला अर्धी-अर्धी मिळणार आहे. आज सकाळपर्यंत ४२ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत तर १० लाख जणांनी रिटर्न दाखल केला आहे आणि २० लाख जणांनी लॉग ईनकरून रिटर्न फॉर्म डाऊनलोड केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांना प्रत्येक महिन्याला रिटर्न फाईल करावा लागणार आहे. पहिल्या महिन्याची रिटर्न फाईल करण्याती तारीख वाढवून २५ ऑगस्ट करण्यात आली आहे. याआधी ही तारीख २० ऑगस्ट होती पण एक दिवस आधी वेबसाईटच बंद पडल्यामुळे ही तारीख वाढवण्यात आली.