मोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी १००० झाडांची कत्तल

पर्यावरणवाद्यांकडून सरकारवर जोरदार टीका

Updated: Jan 14, 2019, 05:33 PM IST
मोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी १००० झाडांची कत्तल title=

भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी ओदिशा दौरा वादात सापडला आहे. या दौऱ्याच्यावेळी बालंगर परिसरात नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरत्या स्वरुपाचा हेलिपॅड उभारला जाणार आहे. मात्र, त्यासाठी वनविभागाची परवानगी न घेता जवळपास १००० झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून पर्यावरणवादी प्रचंड आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे बालंगर परिसरातील रेल्वेच्या ताब्यातील अडीच हेक्टर जमिनीवर सरकारकडून २०१६ साली वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, आता मोदींच्या आगामी दौऱ्यावेळी याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचा हेलिपॅड उभारायचे ठरवल्यानंतर येथील झाडांवर कुऱ्हाड फिरवण्यात आली. 

'द हिंदू'च्या वृत्तानुसार, या वृक्षतोडीपूर्वी सरकारने वनविभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या सगळ्या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने १००० ते १२०० झाडांची कत्तल झाल्याची कबुली दिली आहे. रेल्वे प्रशासनाने आपण हेलिपॅडसाठी जमीन दिल्याचे सांगत हात झटकले. हेलिपॅड तयार करण्यासाठी आणि सुरक्षेच्यादृष्टीने हे गरजेचे होते, असे स्पष्टीकरण रेल्वे खात्याकडून दिले जात आहे. २०१६ साली झालेल्या वृक्षारोपणानंतर येथील जवळपास ९० टक्के झाडे जगली होती. बहुतांश झाडांची सात फुटांपर्यंत वाढही झाली होती. मात्र, सरकारने वनविभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता या झाडांवर कुऱ्हाड चालवली. त्यामुळे पर्यावरणवाद्यांना सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. 

नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम मंगळवारी पार पडणार आहे. यावेळी खुर्दा-बालगीर रेल्वेमार्गाचे उद्घाटन करण्यात येईल. यानंतर बालगीर येथे मोदींची जाहीर सभाही होईल.