Y+, Z+, X सुरक्षा म्हणजे काय? देशात कोणाला दिली जाते? जाणून घ्या फरक

Security Categories in India : भारतात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते. यात पोलीस कर्मचारी आणि कमांडोंचा समावेश असतो. पण तुम्हाला माहिती आहे का कोणला आणि कोणती सुरक्षा दिली जाते.

राजीव कासले | Updated: Apr 23, 2024, 06:36 PM IST
Y+, Z+, X सुरक्षा म्हणजे काय? देशात कोणाला दिली जाते? जाणून घ्या फरक title=

Security Categories in India : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलीय. पार्थ पवार (Parth Pawar) यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा (Y+ Security) देण्यात आलीय. शासनाकडून आदेश पारित असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय. पार्थ पवार हा अजित पवारांचा मोठा मुलगा असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha 2024) मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता ते आई आणि बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत. पार्थ पवारांच्या सुरक्षेत आता 11 कमांडो तैनात असणार आहेत. 

यावरुन आता विरोधकांनी राज्य सरकारला टीका केली आहे. शानशौकतीसाठी कोणाला सुरक्षा  देऊ नये, गरज असेल तरच सुरक्षा द्या असं विरोधी पक्षांनी म्हटलंय. तर पीएम मोदींसारखी सुरक्षा पार्थ पवारला द्यावी असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.

देशात किती प्रकारच्या सुरक्षा?
देशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते. ज्या व्यक्ती देशासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत किंवा ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही सुरक्षा पुरवली जाते. वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा असते. भारतात पाच प्रकारच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा आहे. यात Z+, Z, Y+, Y आणि X श्रेणीचा समावेश आहे. 

1. Z+ सिक्युरिटी
Z+ सुरक्षा ही भारतातील सर्वोच्च श्रेणीची सुरक्षा मानली जाते. Z+ सुरक्षेत, 10 पेक्षा जास्त NSG कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचं कडं असतं. हे सर्व कमांडो 24 तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवतात. सुरक्षेमध्ये गुंतलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ज्ञ असतो. यासोबतच या कमांडोजकडे आधुनिक शस्त्रेही असतात. भारतात ज्यांना Z+ सुरक्षा आहे त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

2. Z सिक्योरिटी
Z+ नंतर, Z सुरक्षा ही सर्वात सुरक्षित मानली जाते.  यामध्ये 6 ते 7 NSG कमांडोसह 22 सैनिक आणि पोलिस कर्मचारी संबंधित व्यक्तीभोवती तैनात असतात. ही सुरक्षा पोलिस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे जवान पुरवतात. भारतातील अनेक नेते आणि सेलिब्रेटिंना ही सुरक्षा आहे.

3. Y+ सिक्युरिटी
Z सुरक्षेनंतर Y+ सुरक्षा येते. यात 11 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यात 1 किंवा 2 कमांडो आणि 2 PSO असतात. यासोबतच पोलिसांचाही समावेश असतो. नुकतीच पार्थ पवार यांना सरकारने ही सुरक्षा पुरवली आहे.

4. Y सिक्युरिटी
Y श्रेणीच्या सुरक्षेत 1 किंवा 2 कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 8 जवान तैनात असतात. यामध्ये दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (पीएसओ) देखील सुरक्षा म्हणून दिले जातात. भारतात या श्रेणीची सुरक्षा मिळवणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.

5. X सिक्युरिटी
X श्रेणीच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीसोबत 2 सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात असतात. ही सुरक्षा वैयक्तिक सुरक्षा संस्थांद्वारे प्रदान केली जाते. भारतातील मोठ्या संख्येने लोकांना या श्रेणीची सुरक्षा मिळते.

VIP सुरक्षा कोण पुरवते?
भारतात व्हीव्हीआयपींना अनेक संस्थांद्वारे सुरक्षा पुरवली जाते. यात  एसपीजी (SPG), एनएसजी (NSG), आईटीबीपी (ITBP) आणि सीआरपीएफ (CRPF) सारख्या सुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी सरकारला अर्ज द्यावा लागतो. यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून त्या व्यक्तीला असलेल्या धोक्याचा अंदाज घेताल जातो, त्यानंतरच संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते. गृहसचिव आणि महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती कोणत्या व्यक्तीला कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय घेते.