पोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज

कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो.

Updated: Oct 8, 2018, 08:03 PM IST
पोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज title=

मुंबई : कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो. गुंतवणूक करताना या दोन्हीबरोबर टॅक्स सेव्हिंग होत असेल तर सोने पे सुहागा. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला या तिन्ही गोष्टींचा लाभ होऊ शकतो. पोस्ट ऑफिसच्या एनएससी (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) मध्ये बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. एवढच नाही तर तुमची गुंतवणूकही सुरक्षित राहते.

1 ऑक्टोबरपासून एनएससीवर जास्त व्याज

सरकारनं 1 ऑक्टोबरपासून व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. याआधी 5 वर्षांच्या एनएससीवर 7.6 टक्के व्याज मिळत होतं. पण आता हेच व्याज 8 टक्के झालं आहे. कोणत्याही बँकेच्या एफडीपेक्षा हे व्याज जास्त आहे. बँकांमध्ये एफडीवर सध्या जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याज मिळत आहे.

बँकांच्या एफडीचे दर

देशाची सगळ्यात मोठी बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.75 टक्क्यांपासून ते 7.25 टक्के व्याज देत आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 4 टक्के ते 6.85 टक्के व्याज देतंय. आयसीआयसीआय बँक याच कालावधीसाठी 4 टक्के ते 7.25 टक्के व्याज देतंय.

एनएससीमध्ये किती गुंतवणूक करता येते?

पोस्ट ऑफिसच्या एनएससीमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपये गुंतवता येतात. 100 रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 146.93 रुपये परत मिळतील. एनएससीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. पण 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरच तुम्हाला कर लाभ मिळणार आहे.

एनएससी खातं कसं उघडाल?

देशातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला एनएससीमध्ये गुंतवणूक करता येईल. सिंगल होल्डर म्हणून अल्पवयीन मुलांच्या नावावरही तुम्हाला एनएससीमध्ये गुंतवणूक करता येईल.