कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही. 

Updated: May 25, 2018, 04:06 PM IST
कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार title=

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही. यावेळी भाजप आमदारांनी विधानसभा सभागृहातून वॉक ऑऊट केले. जेडीएस आणि काँग्रेस आघाडीच्या सरकारकडे पूर्णपणे बहुमत होते. तर भाजपचे १०४ आमदार होते. त्यामुळे भाजपला या ठरावाच्या विरोधात मतदान करुनही काहीही उपयोग होणार नव्हता. काँग्रेसचे ७८ आणि जेडीएसचे ३७ आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे आघाडी सरकारकडे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे भाजपने सभात्याग करणे पसंत केले. दरम्यान, आता कोणाला कोणते खाते मिळते याकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. आर. रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते सुरेशकुमार यांनी अध्यक्ष निवडणुकीतून माघार घेतली. कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं खेळलेला डाव काहीही उपयोगी ठरला नाही. बहुमत चाचणीआधी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात भाजपने एस. सुरेश कुमार यांना उतरवले. मात्र, निवडून येण्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाची जुळवाजुळव होत नसल्याचे पाहून एस. सुरेश कुमार यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आणि भाजपचा अखेरचा दुसरा डावही समाप्त झाला.

बहुमत ठरावाच्या आधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बी एस येडियुरप्पा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार आहे,असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा दिलाय. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज माफी देण्यावर भर राहिलं. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायचे हे मला तुम्ही मला सांगण्याची गरज नाही, असे सांगत भाजपला सुनावले.