आज कर्नाटकचं सरकार पडणार ? काय आहे भाजपची रणनीती

कुमारस्वामी यांचं सरकार पडणार असल्याची चर्चा

Updated: Jan 17, 2019, 10:46 AM IST
आज कर्नाटकचं सरकार पडणार ? काय आहे भाजपची रणनीती title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. एकमेकांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपची नजर अपक्ष आमदारांवर देखील आहे. याआधीच २ अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. पण सरकार अल्पमतात येणार की नाही याबाबत अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही. आज कुमारस्वामी यांचं सरकार पडणार अशीचं चर्चा स्थानिक मीडियामध्ये आहे. कुमारस्वामी यांनी स्वत: या चर्चांना दुजोरा दिला आहे. पण अजून तरी कुमारस्वामी सरकार बहुमतात आहे. मुंबईमध्ये असलेले काँग्रेसचे चार नाराज आमदारांपैकी एका आमदाराने काँग्रेस न सोडण्याचा निर्णय़ घेतला आहे. पण अजूनही काही आमदार भाजपच्या संपर्कात आहे.
 
काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी म्हटलं की, त्यांच्या पक्षाचा एकही नेता पक्ष सोडणार नाही. मी आमदारांच्या संपर्कात आहे. रमेश जारकीहोलीच्या नेतृत्वात काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे कुमारस्वामी यांचं सरकार पाडता येईल. जारकीहोली यांचा मागील महिन्यात कॅबिनेटमधून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांचा विभाग त्यांचाच भाऊ सतीश जारकीहोली यांना देण्यात आलं आहे.

कुमारस्वामींचा विश्वास कायम 

कर्नाटकमध्ये राजकीय उलथा-पालथ होत असताना मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी बुधवारी म्हटलं की, हे संकट लवकरच दूर केलं जाईल. सोबतच त्यांनी भाजपला टीका देखील केली. २०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-जेडीएस एकत्र लढेल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.

भाजपची रणनीती

भाजप सध्या खूपच विचार करुन आणि सांभाळून पावलं टाकत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी ते असं काहीही करु इच्छित नाही ज्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल. सूत्रांच्य़ा माहितीनुसार पक्षाचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या संपर्कात आहेत. पण याबाबत काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्यानंतरच काँग्रेस पुढचे पाऊलं उचलणार आहे. कर्नाटकमधील भाजपचे सर्व आमदार सध्या गुरुग्राममध्ये आहेत.