पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय वाढवा, संसदेत विधेयक

पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या मुलींच्या वयाची मर्यादा वाढवावी

Updated: Mar 8, 2018, 08:39 PM IST
पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय वाढवा, संसदेत विधेयक

नवी दिल्ली : पालकांच्या संमतीविना लग्न करणाऱ्या मुलींच्या वयाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. सध्या १८ असलेलं हे वय २१ वर्ष करावं अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी संसदेत खासगी सदस्य विधेयकही सादर केलं आहे.

अजाणतेपणे मुली पालकांच्या संमतीविना पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. अशाप्रकारे लग्न करून काही वेळा मुली फसतात त्यामुळे पालकांच्या संमतीविना मुलींच्या लग्नाचं वय २१ करण्यात यावं. पालकांची संमती असेल तर वयाची मर्यादा १८ वर्षच असावी, असं वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलं आहे.

१८व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो मग लग्नाचा का नाही? असा प्रश्नही गोपाळ शेट्टी यांना विचारण्यात आला. १८ व्या वर्षी मत देताना चूक झाली तर पाच वर्षांनी ही चूक दुरुस्त करता येते पण लग्न केल्यानंतर अशी संधी मिळत नाही, अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टींनी दिली.