मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काय होते इंधनाचे दर?

 इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेसनं देशभरात बंद पुकारला.

Updated: Sep 10, 2018, 08:12 PM IST
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काय होते इंधनाचे दर? title=

नवी दिल्ली : इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेसनं देशभरात बंद पुकारला. केंद्रातल्या मोदी सरकारच्या कार्यकाळातलं हे शेवटचं वर्ष आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे सरकार अडचणीत आलंय. या दरवाढीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत कमजोर झालेल्या रुपयाचं कारण सरकारनं दिलं आहे. पण मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या काळातल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर एक नजर टाकूया.

मनमोहन सिंग यांचा पहिला कार्यकाळ

२००४ ते २००९ या काळात मनमोहन सिंग यांच्या सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किंमती सांभाळल्या. या कालावधीमध्ये दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले. या कालावधीमध्ये दर ४०-४७ रुपयांमध्ये होते. तर मुंबईत हे दर थोडे जास्त म्हणजे ४५-५० रुपये होते. मायक्रोट्रेंड्स नावाच्या शोध संस्थेनं दिलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीमध्ये कच्च्या तेलाची किंमत ५० डॉलर प्रति बॅरल ते १६० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती. कच्च्या तेलाचे मोठ्या प्रमाणावर दर वाढले तरी मनमोहन सिंग यांच्या सरकारनं घरगुती बाजारात स्थिरता ठेवण्यात यश मिळवलं होतं.

दुसरा कार्यकाळ

मनमोहन सिंग यांचा दुसरा कार्यकाळ आर्थिक मंदीनं सुरु झाला. या कालावधीमध्ये जगभरातली मागणी कमी झाली होती. त्यामुले जून २००८ साली १६१ डॉलर प्रति बॅरल असणारे कच्च्या तेलाचे भाव जानेवारी २००९ साली ४९.८३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारसाठी हा दिलासा होता पण मंदीमुळे अर्थव्यवस्थेपुढे दुसरी आव्हानं होती.

मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती ४० ते ७३ रुपयांपर्यंत होत्या. मुंबईमध्ये हा आकडा ४४ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचला. या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५० ते १२७ डॉलर प्रति बॅरल होते.

मोदी सरकार

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाची तुलना मोदी सरकारसोबत केली तर या सरकारसाठी सुरुवातीची वर्ष दिलासादायक होती. मोदींची सत्ता आली तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल ११२ डॉलर प्रति बॅरल होते. ६ महिन्यांमध्ये हे दर कमी होऊन ५० डॉलर प्रति बॅरल झाले होते. मागच्या एका दशकातले हे सर्वात कमी दर होते. यानंतरही कच्च्या तेलाच्या दरामध्ये घटच झाली. जानेवारी २०१६मध्ये या किंमती ३० डॉलर प्रति बॅरल झाल्या. यानंतर मात्र कच्च्या तेलांच्या किंमती वाढत गेल्या. जानेवारी २०१७ मध्ये किंमत ५४ डॉलर तर जानेवारी २०१८ मध्ये ६५ डॉलर झाली. सध्या कच्च्या तेलाची किंमत जवळपास ७७ डॉलर प्रति बॅरल आहे.

या दोन्ही सरकारची तुलना केली तर मनमोहन सिंग यांनी इंधनाचे दर नियंत्रणात ठेवले असं म्हणावं लागेल. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात कच्चं तेल १६० डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं होतं तेव्हा दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ७३ रुपये प्रती लिटर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर ७७ डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोलची किंमत ८८ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

मनमोहन आणि मोदी सरकार यांच्या या तुलनेमध्ये डॉलरच्या तुलनेत कमजोर झालेल्या रुपयाचं समायोजन करण्यात आलेलं नाही. पण हे समायोजन केलं तरी मनमोहन सरकारनं इंधनाच्या किंमती जास्त नियंत्रणात ठेवल्या होत्या.