केंद्र सरकार मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी देणार 51,000 रूपयांचा ‘शादी शगुन’

 देशातील मुस्लिम मुलींनां उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पूढे टाकले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 6, 2017, 02:00 PM IST
केंद्र सरकार मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी देणार 51,000 रूपयांचा ‘शादी शगुन’ title=

नवी दिल्ली: देशातील मुस्लिम मुलींनां उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पूढे टाकले आहे.

अल्पसंख्याक समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम मुलींना यापूढे केंद्र सरकार ‘शादी शगुन’ म्हणून 51, 000 रूपये देणार आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणारी संस्था ‘मैलाना आजाद एज्युकेशन फाऊंडेशन’ने (एमएईएफ) मुस्लिम मुलींना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएईएफने दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिम मुली आणि त्यांच्या पालकांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लोकांमध्ये या उपक्रमाचा वेगाने प्रसार व्हावा यासाठी या उपक्रमाला ‘शादी शगुन’ असे नाव देण्यात आले आहे.

मुस्लिम मुलींना मिळणार स्टायफंड

दरम्यान, अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नख्वी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएईएफच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्यात विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यासोबत ‘शादी शगुन’सारख्या उपक्रमाचाही समावेश आहे. यासोबतच इयत्त 9वी  आणि 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम महिलांना 10 हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. आतापर्यंत  इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलींना 12 हजार रूपये शिष्यवृत्ती म्हणून मिळत होते.

एमईएफचे खजीनदार (Treasurer) हुसेन अन्सारी यांनी बोलताना सांगितले की, ‘मुस्लिम समाजात आजही शिक्षणापासून वंचीत राहणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. केवळ आर्थिक समस्या हेच या पाठिमागचे मूळ कारण आहे. हा उपक्रम सुरू करताना आमचा हाच उद्देश आहे की, शिक्षणसाठी मुली आणि त्यांच्या पालकांना प्रोत्साहीत करणे. जेणेकरून मुस्लिम मुली किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तरी पूर्ण करू शकतील.यासाठीच ‘शादी शगुन’उपक्रमांतर्गत 51,000 रूपयांचे देण्याची आम्ही घोषणा केली आहे.’

पूढे बोलताना अन्सारी यांनी सांगितले, ‘ आम्हाला माहिती आहे, 51,000 हजार ही फार मोठी रक्कम नक्कीच नाही. पण, यामुळे मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी पालकांचा उत्साह नक्की वाढेन. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी लवकरच एक संकेतस्थळही सुरू केले जाईल. त्यासंदर्भातील माहितीही लवकरच प्रसारीत केली जाईल’, अशी माहितीही अन्सारी यांनी या वेळी दिली.