कारगिल विजय दिवस: ५०० पेक्षा जास्त जवानांचं बलिदान

या युद्धानंतर भारताचं झालं होतं जगभरातून कौतूक

Updated: Jul 26, 2018, 09:35 AM IST
कारगिल विजय दिवस: ५०० पेक्षा जास्त जवानांचं बलिदान title=

मुंबई : आज कारगील विजयी दिवस आहे. १९ वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध हे युद्ध झालं होतं. ८ मे १९९९ मध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस युद्ध चाललं होत. २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून कारगिलला मुक्त करण्यात आलं. पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. शत्रुविरोधात भारतीय लष्करानं ऑपरेशन विजय मोहिम सुरु केली होती. या युद्धात ५०० पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर तेराशे जवान जखमी झाले होते. देश आज त्या शहिद जवानांची आठवण काढत आहे. कारगिलमध्ये शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

१९९९ मध्ये पाकिस्तानच्या घुसखोरांनी भारतीय सीमेत घुसखोरी केली. घुसखोरी करत त्यांनी काही भागावर ताबा मिळवला. तेव्हा भारतीय जवानांकडून त्यांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ठाणी कारगिल आणि द्रास हा अतिशय उंच भाग आहे. काही महिने चाललेल्या या युद्धात भारताला ठाणी परत मिळवण्यात यश आलं. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अति उंचीवरच्या युद्धाचं एक उदाहरण आहे. भारताने हे युद्ध कारगिलपुरतंच मर्यादित ठेवलं. भारताने दाखवलेल्या या संयमाचं जगभरातून कौतूक झालं. यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला. या युद्धानंतरच भारताने संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. या युद्धामुळे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.