नितीश कुमार यांची रिकामी जागा नजरेत भरली...

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असले, तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रिकामी जागा अनेकांना खटकलीच.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2017, 11:20 PM IST
नितीश कुमार यांची रिकामी जागा नजरेत भरली... title=
छाया - पंतप्रधान मोदी ट्विटर पेज

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असले, तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची रिकामी जागा अनेकांना खटकलीच.

शरद यादव त्यांच्या पक्षाकडून या बैठकीला हजर असले, तरी कुमारांनी याकडे पाठ का फिरवली याबाबत दिल्ली आणि पाटण्यामध्ये चर्चा रंगली.

शिवाय, आज दिल्लीला जाणं टाळणारे नितीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्याचं आमंत्रण मात्र स्वीकारलंय. मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या स्वागतार्थ मोदींनी ही मेजवानी ठेवली  आहे. याबाबत विचारलं असता हा केवळ गैरसमज असल्याचं सांगत नितीश कुमारांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. 

दरम्यान, मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत विरोधी पक्षांनी आज एक जुटीचे दर्शन घडवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या मेजवानीला तब्बल 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

राज्या-राज्यांत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्षही एकाच मांडवाखाली आल्याचं या निमित्तानं दिसलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माकपाचे सीताराम येच्युरी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा नेत्या मायावती यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, डीएमकेच्या कनिमोळी, जेडीयूचे शरद यादव आदी बडे नेते यावेळी हजर राहिले. सरकारनं सर्वसंमतीचा उमेदवार दिला नाही, तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी यावेळी केला.