सरकारविरोधातील अविश्वास ठराव असफल, रालोआच्या पारड्यात 325 मते

अविश्वास ठरावाच्या बाजूने 126 जणांनी मतदान केले तर या ठरावाच्या विरोधात 325 जणांनी मतदान केले.

Updated: Jul 20, 2018, 11:30 PM IST
सरकारविरोधातील अविश्वास ठराव असफल, रालोआच्या पारड्यात 325 मते title=

नवी दिल्ली: तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) शुक्रवारी संसदेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारविरोधात मांडलेला अविश्वास ठराव असफल ठरला. अविश्वास ठरावाच्या बाजूने 126 जणांनी मतदान केले तर या ठरावाच्या विरोधात 325 जणांनी मतदान केले. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मोदी सरकारनं विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला आहे. मतदानादरम्यान शिवसेना आणि अण्णाद्रमुक यांच्यासह सर्व पक्षांचे मिळून जवळपास 92 खासदार अनुपस्थित होते.

सध्या लोकसभेत एकूण ५३४ खासदार आहेत. त्यापैकी २७३ खासदार भाजपचे आहेत. त्यात एनडीएच्या घटक पक्षाचे खासदार धरले तर एनडीएचा आकडा ३१३ होते. त्यामुळे एनडीएला जास्तीची 12 मते कोणत्या खासदारांनी दिली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सभागृहातील खासदारांना हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्याचे आवाहन केले. ज्या गतीने सरकारने काम केले आहे, त्यावर विश्वास दाखवला पाहिजे. काहींनी प्रस्तावाला समर्थन दिले. पण मोठी संख्या ही प्रस्तावाविरोधात आहे. त्यामुळे आपण हा अविश्वास ठराव रद्द करावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.