मुंबईतल्या जिना हाऊसवर पाकिस्तानने सांगितला हक्क

ही संपत्ती पाकिस्तानच्या दुतावासांना देण्यात यावी अशी मागणी काही वर्षांपासून पाकिस्तानतर्फे होत आहे. 

Updated: Dec 20, 2018, 09:32 PM IST
मुंबईतल्या जिना हाऊसवर पाकिस्तानने सांगितला हक्क title=

इस्लामाबाद : मुंबईतील जिना हाऊस आमचे असून भारताद्वारे ते नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न आम्हाला मान्य नसल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले आहे. जिना हाऊस आपल्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांनी सांगितले होते. मुंबईतल्या मलबार हिल येथील या बंगल्याचे डिझाइन वास्तुशिल्प क्लाउड बाटली यांनी युरोपीय शैलीत तयार केले होते. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना हे 1930 दशकाच्या उत्तरार्धापर्यंत तिथे राहिले. या बंगल्याच्या पुढचा भाग हा समुद्राच्या दिशेने आहे. ही संपत्ती पाकिस्तानच्या दुतावासांना देण्यात यावी अशी मागणी काही वर्षांपासून पाकिस्तानतर्फे होत आहे.

आमचा हक्क 

 जिना हाऊसवर आमचा हक्क असून कोणी त्याचे हक्क घ्यावेत हे आम्हाला आवडणार नाही, असे पाकचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी माध्यमांना सांगितले. ही वास्तु पाकिस्तानची असल्याचे भारताने याआधीच मान्य केले आहे. आमच्याकडे तसे पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.

जिना हाऊसच्या बदल्यात पाकिस्तान भारताला करतारपूर येथील जमीन देईल का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते 'मुळीच नाही' असे उत्तरले.

तोडण्याची मागणी  

मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस गेल्यावर्षी मार्चमध्ये चर्चेत आले होते. जिना हाऊस तोडून तिथे सांस्कृतिक केंद्र उभारावे अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. याबाबत त्यांनी संरक्षण मंत्र्यांनाही पत्र लिहले होते.

हा बंगला सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात असून देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि त्यावर लाखो रुपये खर्च होत असल्याचं लोढा यांनी म्हटले होते. शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाल्यानंतर जिना यांचे वारसदार जिना हाऊसवर दावा करु शकत नसल्याचंही लोढा यांनी सांगितले होते.