पेट्रोल २ रुपयांनी महागले तर डिझेलच्या दरात १.८९ रुपयांची वाढ

  महागाईचा दर सातत्याने वाढतोय. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज गगनाला भिडतायत.

Updated: May 21, 2018, 12:14 PM IST

 

नवी दिल्ली :  महागाईचा दर सातत्याने वाढतोय. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज गगनाला भिडतायत. गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या दरात प्रती लीटर २ रुपयांची वाढ झालीये तर डिझेलच्या दरात प्रती लीटर १.८९ रुपयांची वाढ झालीये. तेल कंपन्यांकडून सकाळी जाहीर केलेल्या दरानुसार, सोमवारी पेट्रोलच्या दरात ३३ पैसे आणि डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रती लीटर ७६.५७ रुपयांवर पोहोचलेत तर डिझेलच्या दरानेही रेकॉर्ड करताना ते ६७.८२ रुपये प्रती लीटरवर पोहोचलेत. 

कच्च्या तेलामुळे किंमतीत वाढ

गेल्या चार आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होतोय. स्थानीय सेल्स टॅक्स आणि वॅटनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोल आणि डिझेलटे दर वेगवेगळे असतात. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी असतात.

८ दिवसांपासून सातत्याने वाढ

सोमवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रती लीटर ३३ पैशांनी वाढ होत ते सर्वाधिक ७६.५७ रुपयांवर पोहोचले. याआधी सप्टेंबर २०१४मध्ये दिल्लीत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यावेळी याचे दर ७६.०६ इतके होते. 

मुंबईत पेट्रोल सर्वाधिक महागले

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या किंमती सर्वाधिक ८४.४० रुपये प्रती लीटर आहेत. तर भोपाळमध्ये या किंमती ८२.१६ रुपये आहेत. पाटण्यात पेट्रोल ८२.०६ रुपये प्रती लीटरने विकले जातेय. हैदराबादमध्ये ८१.०९ आणि श्रीनगरमध्ये ८०.६८ रुपयांना पेट्रोलची विक्री होतेय. सगळ्यात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये मिळते. येथे पेट्रोलचे दर प्रती लीटर ६६.०१ इतके आहे.